पीटीआय, बारपेटा (आसाम)

जमावाला चिथावणी दिल्याबद्दल राहुल गांधींसह काही काँग्रेस नेत्यांवर गुवाहाटी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी राहुल यांनी येथील भाजप सरकारला ‘जास्तीतजास्त खटले दाखल करा,’ असे आव्हान दिले.

बारपेटा जिल्ह्यातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या सातव्या दिवशी आपल्या पहिल्या जाहीर सभेत बोलताना, राहुल गांधींनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर टीका केली. जमीन व्यवहार आणि सुपारी गैरव्यवहारांतील आरोपांवरून राहुल यांनी सरमा यांना देशातील ‘सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री’ असे संबोधले. राहुल म्हणाले,‘‘मला कळत नाही की माझ्यावर खटले दाखल करून मला धमकावता येईल, ही कल्पना हिमंता बिस्वा सरमा यांना सुचली कशी? करा, तुम्ही जितके खटले दाखल करू शकता तितके करा, आणखी २५ खटले दाखल करा, मी घाबरणार नाही. मला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धमकावू शकत नाही.’’

Story img Loader