तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगु देशमचे नेते चंद्राबाबू नायडू हे पुढील आठवडय़ात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत प्रचार करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

नायडू हे गांधी यांच्यासमवेत २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत. तेलंगणमध्ये तेलुगु देशम आणि काँग्रेस महाआघाडीचा एक भाग म्हणून निवडणूक लढणार असून त्यामध्ये भाकप आणि तेलंगण जन समितीही सहभागी आहे.

जातीयवादी विधान काँग्रेसला भोवणार?

कलमनाथ यांच्यानंतर सी. पी. जोशी या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला राजस्थान विधानसभा निवडणुकीत अडचणीत आणले आहे! ‘फक्त ब्राह्मणांनाच हिंदू धर्माचे ज्ञान असते’, असे अत्यंत वादग्रस्त विधान जोशी यांनी प्रचारादरम्यान केले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानाची तातडीने दखल घेत जोशी यांना माफी मागण्याची सूचना केली आणि ‘बरहुकूम’ जोशींनी माफीही मागितली. राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला मतदान होत आहे. राज्यात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असले तरी आता मात्र, काँग्रेस नेत्याच्या जातीयवादी वक्तव्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एके काळी प्राध्यापक असणारे सी. पी. जोशी राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जातात. जोशींनी नथद्वारा येथे प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यावर जातीवाचक निंदा केली.

‘कॉम्प्युटर बाबा’ काँग्रेसच्या पाठीशी

मध्य प्रदेशात चर्चेत आलेल्या कॉम्प्युटर बाबांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. स्वामी नामदेव त्यागी हे कॉम्प्युटर बाबा या नावाने ओळखले जाताता. राज्यातील भाजप सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. धर्मगुरूंनी आयोजित केलेल्या नर्मदे संसदेत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली. भाजपला आम्ही १५ वर्षे दिली. आता काँग्रेसला निश्चितच पाच वर्षे देऊ, असे त्यांनी सभेत स्पष्ट केले. नद्यांमधील बेकायदा उपसा रोखण्यासाठी भाजपचे ठोस असे काही केले नाही, असा आरोप त्यांनी केला.