काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. या यात्रेत चालताना खासदार राहुल गांधी यांची एका तरुणाने गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कवच भेदून हा तरुण राहुल गांधी यांच्याकडे आल्याचे म्हटले जात होते. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला होता. दरम्यान, यावर राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. त्यांनी तरुणाने मला उत्साहात भेटण्याचा प्रयत्न केला. त्याला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी म्हटले जाऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ते पंजाबमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तरुणाने जे केले त्याला सुरक्षेतील त्रुटी म्हणू नका. त्यावेळी कोणतीही सुरक्षा त्रुटी नव्हती. सध्या लोकांमध्ये खूप उत्साह आहे. सुरक्षा व्यवस्थेने त्याला लगेच बाजूला केले,” असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >> Video : राहुल गांधींच्या सुरक्षेत पुन्हा हलगर्जीपणा? पंजाबमध्ये तरुण थेट जवळ आला अन्…

तो तरुण खूप उत्साही होता

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “तरुणाने सुरक्षा भेदलेली नाही. लोकांना राहुल गांधी यांना भेटायचे आहे. राहुल गांधीदेखील लोकांना भेटत आहेत. सुरक्षा व्यवस्थेने तपासणी केल्यानंतरच तो तरुण राहुल गांधी यांच्याकडे आला. तो तरुण खूप उत्साही होता. याच उत्साहातून त्याने राहुल गांधी यांची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला,” असे राजा वारिंग यांनी सांगितले.

हेही वाचा >>  ललित मोदींनी मागितली मुकुल रोहतगींची जाहीर माफी, आईचा उल्लेख करत म्हणाले; “रागाच्या भरात…”

नेमकं काय घडलं होतं?

भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमधील होसिनापूर येथे आहे. यात्रेमध्ये राहुल गांधी चालत होते. मात्र यावेळी एक तरुण त्यांच्याकडे धावत आला. तसेच सुरक्षा भेदून हा तरुण राहुल गांधी यांची गळाभेट घेण्याचा प्रयत्न करत होता. तरुण आपल्याकडे येत असल्याचे समजताच राहुल गांधी यांनी त्याला बाजूला केले. त्यानंतर सुरक्षा रक्षक तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला दूर केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रसंगानंतर राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi comment on security breach in punjab and youn man try to hug prd