गेल्या काही महिन्यांपासून देशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा चालू आहे. सध्या हरयाणामध्ये यात्रेचा टप्पा चालू असून लवकरच यात्रेचा शेवटचा टप्पा सुरू होईल. या पार्श्वभूमीवर आज हरियाणातील होशियारपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून राहुल गांधींनी संघावर हल्लाबोल केला. तसेच, वरुण गांधींविषयी विचारलेल्या प्रश्नावरही राहुल गाधींनी आक्रमकपणे उत्तर दिलं.
“…त्यासाठी माझा गळा चिरावा लागेल”
वरुण गांधींची भेट घेऊन भारत जोडोप्रमाणे कुटुंबही जोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर राहुल गांधींनी सडेतोड उत्तर दिलं. “वरुण गांधी हे भाजपात आहेत. ते जर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर त्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. माझी आणि वरूण गांधींची विचारधारा वेगळी आहे. मी कधीही संघ मुख्यालयात जाऊ शकत नाही. त्यासाठी माझा गळा चिरावा लागेल. माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. मी वरूण गांधींना भेटू शकतो, त्यांना आलिंगन देऊ शकतो मात्र त्यांची विचारधारा मी कधीच अंगिकारू शकत नाही”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
दरम्यान, हिंदुंनी आक्रमक असणं हे नैसर्गिक आहे. कारण गेल्या हजारो वर्षांपासून ते युद्ध करत होते, असं मोहन भागवत म्हणाल्याबाबत राहुल गांधींना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली असता त्यांनी त्यावरून संघावर आणि मोहन भागवतांवर टीका केली.
“हिंदुत्वात कुठेही असं लिहिलेलं नाही की…”
“मला माहिती नाही की ते नेमकं कोणतं हिंदुत्व सांगत आहेत. मी कधीही याबाबत ऐकलं नाही. मी भगवतगीता वाचलीये, मी उपनिषदं वाचली आहेत. पण मी कुठेही वाचलं नाही की हिंदुंनी आक्रमक असायला हवं. हिंदुत्व हे पूर्णपणे स्वनिरीक्षण, स्वत:ला समजून घेणं, नम्रता, करुणा यावर आधारीत आहे. मी हे कुठेही वाचलं नाही. कदाचित त्यांनी ही पुस्तकं वाचली नसतील”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
“वरूण गांधी आणि माझी विचारधारा वेगळी, माझा गळा चिरला तरीही मी RSS…” राहुल गांधी यांचं वक्तव्य
“भगवान राम यांनाही रावणाबद्रल करुणा वाटली होती. जेव्हा रावण मरणाला टेकला होता, तेव्हा भगवान राम प्रेमभावनेनं त्याच्याशी बोलत होते. त्यामुळे मला माहीत नाही की मोहन भागवतांना या कल्पना कुठून मिळत आहेत. या नक्कीच हिंदू संकल्पना नाहीत. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्पना आहेत”, असं ते म्हणाले.
“हिंदू शांतताप्रिय धर्म आहे”
“हिंदू धर्मात किंवा इतर कोणत्याही धर्मात द्वेष पसरवणं हे कुठेही म्हटलेलं नाही. हिंदू धर्म शांतताप्रिय, प्रेमभावना पसरवणारा धर्म आहे. त्यांना जो कुठला रंग हवाय, तो रंग ते घेऊ शकतात. पण जे हिंदू धर्मात लिहिलंय, ते ते करत नाहीत. ते काहीतरी वेगळं करतात. हिंदू धर्मात असं म्हटलेलं नाही की लोकांना घाबरवलं पाहिजे, धमकावलं पाहिजे”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.