नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावरून बुधवारी रणकंदन माजले. उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलकडे निघालेल्या काँग्रेस नेत्यांचा ताफा संसदेपासून सुमारे ३० किमीवर असलेल्या गाझीपूर सीमेवर अडवला गेला. राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांचा पोलिसांची नाकाबंदी तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर भाजपने राहुल गांधींवर स्टंटबाजीचा आरोप केला.
संसदेच्या दोन्ही सदनांतही काँग्रेस नेत्यांच्या अडवणुकीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेचा निषेध करत काँग्रेसच्या सदस्यांनी दोन्ही सदनांचा सभात्याग केला. संभलमध्ये मुघलकालीन शाही जमा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारानंतर तणावाची परिस्थिती आहे. पीडित कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी संभलच्या दौऱ्यावर निघाले होते.
‘सप’ची टीका आणि समर्थन
संसदेतील दोन्ही सदनांमध्ये संभलमधील हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत काँग्रेसचे नेते सहभागी झाले असले तरी संभलचा मुद्दा गांभीर्याने घेतला नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला. राहुल गांधी यांनी संभलचा दौरा आधीच जाहीर केला असला तरी, काँग्रेसचे नेते औपचारिकतेचा भाग म्हणून संभलाला भेट देत आहेत, अशी टीका ‘सप’चे राज्यसभेतील खासदार रामगोपाल यादव यांनी केली. गाझीपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला गेल्यानंतर मात्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला. भाजपच्या आडमुठेपणावरही अखिलेश यांनी टीका केली. राहुल गांधी हिंसाचारग्रस्त भागाला भेट देऊन येणार होते, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होता, असा सवाल अखिलेश यादव यांनी केला.
हेही वाचा >>> Sukhbir Singh Badal Firing : सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळी झाडणारा व्यक्ती कोण? खलिस्तानी दहशतवाद्यांशी आहे कनेक्शन
‘आघाडी टिकवण्यासाठी खटाटोप’
काँग्रेसच्या नेत्यांना संभलप्रकरणाशी काहीही घेणेदेणे नाही. या मुद्द्यावर काँग्रेसच्या एकाही नेत्याने ना टिप्पणी केली ना भूमिका मांडली. आता अचानक काँग्रेसला संभलमधील हिंसाचाराची आठवण आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये चमकण्यासाठी राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांनी नाट्य निर्माण केले. ‘इंडिया’ आघाडी फुटीच्या मार्गावर असून त्यांना एकत्र ठेवण्याच्या खटाटोपाच्या भाग म्हणून राहुल गांधींना नाइलाजाने संभलचा दौरा आयोजित करावा लागला, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता व राज्यसभेतील खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केली.
राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे संभलमधील संवेदनशील परिस्थिती चिघळण्याची भीती होती. तिथली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहराबाहेरील लोकांसाठी प्रवेशबंदी लागू केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनाही तिथे जाण्यास मनाई करण्यात आली. – प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री
लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून संभलला जाण्याचा मला अधिकार आहे. मी एकटा जाण्यास तयार असल्याचे मी सांगितले, मी पोलिसांबरोबर जायलाही तयार आहे. पण, त्यांनी दोन्हीपैकी एकही पर्याय स्वीकारला नाही. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा