काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. ते आज इंफाळ या ठिकाणी पोहचले आहेत. राहुल गांधी हे जेव्हा चुराचांदपूर या ठिकाणी पोहचले तेव्हा त्यांच्यासह त्यांचा ताफा हिंसाचाराच्या भीतीने अडवण्यात आला. पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून अडवलं आहे. मागच्या महिन्यापासूनच मणिपूर पेटलं आहे. अनेक लोक विस्थापित झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये मागच्या म्हणजेच महिन्यापासून जातीय हिंसाचार भडकला आहे. या ठिकाणी ३०० हून जास्त शिबीरांमध्ये ५० हजार लोक वास्तव्य करत आहेत.
राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूर या ठिकाणी अडवण्यात आला आहे. इंफाळहून २० किमी अंतरावरच राहुल गांधी आणि त्यांचा ताफा अडवण्यात आला आहे. हिंसाचार सुरु असलेल्या मणिपूरच्या कंगपोकपी जिल्ह्यातल्या हरओठेल गावात गुरुवारी काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला.
काँग्रेस पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी इंफाळ या ठिकाणी शिबीरात राहणाऱ्या लोकांची भेट घेणार आहेत. ३ मे पासून या ठिकाणी हिंसाचार सुरु झाला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे.
मणिपूरमध्ये मेईती आणि कुकी समुदायाच्या दरम्यान हिंसा सुरु झाली आणि मणिपूर पेटलं. या घटनेत आत्तापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमध्ये ५३ टक्के लोकसंख्या ही मेइती समाजाची आहे. हे सगळे प्रामुख्याने इंफाळच्या डोंगराळ भागात राहतात. नगा, कुकी या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ही ४० टक्के आहे. या दोहोंमध्ये वाद सुरु झाला आहे. संघर्ष चिघळला आहे.