यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सडकून टीका करणारा भाजप आणि त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी भाजपशासित राज्यांमधील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे एका जाहीर सभेत केला. संसदेत भाजपनेच भ्रष्टाचारविरोधातील सहा विधेयके मंजूर होऊ दिली नाहीत, असेही गांधी म्हणाले.
नरेंद्र मोदी देशभर दौरे करून भ्रष्टाचाराचे उच्चटन करण्याच्या गोष्टी करतात. परंतु त्यांच्याच पक्षाचे कर्नाटकमधील नेते भ्रष्टाचारात किती बुडालेले आहेत ते मोदी यांना दिसते का, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून कारागृहाची हवा खावी लागली. इतकेच नव्हे तर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कर्नाटकमधील १६ मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, तेही मोदी यांना दिसत नाही का, असा सवालही गांधी यांनी केला.
येथे आयोजित भारत निर्माण मेळाव्यात राहुल गांधी पुढे म्हणाले की, मोदी यांना छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील भ्रष्टाचार दिसत नाही. भ्रष्टाचारामुळेच कर्नाटकमधील जनतेने भाजपला पायउतार केले.  दरम्यान, संसदेत भ्रष्टाचारविरोधी सहा विधेयके मंजूर होण्यात भाजपने खोडा घातल्याचा आरोप गांधी यांनी केला.