काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदी सरकारमधील मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाच्या व्हायरल व्हिडीओचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलं. मोदींच्या मंत्र्याचा मुलगा व्हिडीओ कॉलवर नागरिकांचे पैसे चोरतो. मात्र, त्याच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच मध्य प्रदेशमध्ये सध्या ५० टक्के दलाली घेणारं सरकार आहे, असा मोठा आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारमधील मंत्री तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ बघितला का? तो सर्वांसमोर, व्हिडीओ कॉलवर काहीही न लपवता, न घाबरता मध्य प्रदेशच्या गरीब नागरिकांचा पैसा लुटत आहे. तोमर यांच्या मुलावर नरेंद्र मोदींनी कारवाई केली का? सीबीआय, ईडी, आयकर विभागाची चौकशी केली का? मध्य प्रदेशमध्ये ५० टक्के दलाली घेणारं सरकार चालत आहे.”
“मंत्र्यांकडून नागरिकांच्या पैशाचा भ्रष्टाचार, पण कारवाई नाही”
“महाकाल कॉरिडोअरमध्ये चोरी करण्यात आली. व्यापम घोटाळ्यात १ कोटी तरुणांचं नुकसान केलं. यात ४० लोकांचा जीव गेला. त्याची कोणतीही चौकशी नाही. पटवारी परीक्षा घोटाळ्यातही कोणतीही चौकशी नाही. एमबीबीएसच्या जागा विकल्या जातात, पण त्याचीही काहीच चौकशी नाही. एकामागून एक मंत्री, त्यांचे कुटुंब नागरिकांच्या पैशांचा भ्रष्टाचार करत आहे. त्यावर कोणतीच कारवाई होत नाही,” असा आरोप राहुल गांधींनी केला.
“मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये टाकले का?”
मोदींच्या आश्वासनांवर आणि घोषणांवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी म्हणाले होते की, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये टाकू. टाकले का? मोदी म्हणाले होते की, नोटबंदी करून काळा पैसा संपेल. काळा पैसा संपला का? कोरोनात काळात मोदींनी मोबाईलची लाईट लावायला सांगितलं, ताटं वाजवायला लावली आणि करोना संपेल असं म्हटलं.”
हेही वाचा : “मोदी दिवसातून दोनदा लाखो रुपयांचे सूट बदलतात”, राहुल गांधींची टीका; म्हणाले, “मी फक्त…”
“करोनात ऑक्सिजन-औषधांच्या अभावी लाखो लोकांचा मृत्यू”
“मोदींनी ताटं वाजवायला सांगितलं, पण इकडे मध्य प्रदेशमध्ये लाखो लोकांना ऑक्सिजन मिळाला नाही. करोनाची औषधं मिळाली नाही. त्यात घोटाळा झाला. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. हे यांचं राजकारण आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.