केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा एकदा लागू करण्याची मागणी भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता कंगना रणौत यांनी या विधानाबाबत माफी मागितली आहे. यावरूनच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी एक्स या समाजमाध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

“सरकारचे धोरण नेमकं कोण ठरवतं? एक भाजपा खासदार की पंतप्रधान मोदी? पंजाब आणि हरियाणातील ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही भाजपाचे मन भरलेलं नाही. इंडिया आघाडी देशाच्या अन्नदात्यांविरोधातील भाजपाचा एकही षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान करणारे कोणतेही पाऊल उचलले गेले, तर नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल”, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा – “छोट्या गुंतवणूकदारांचे १.८ लाख कोटी रुपये लुटणारे…”; राहुल गांधींचा पुन्हा सेबीवर हल्लाबोल; म्हणाले…

“…तर इंडिया आघाडी मोदींविरोधात एकजुटीने उभी राहिल”

पुढे बोलताना, “भाजपाचे लोक अनेकदा विविध कल्पनांची चाचणी करून बघतात. ते कुणालातरी एखादी कल्पना सार्वजनिकपणे मांडण्यास सांगतात आणि त्यावर जनता काय प्रतिक्रिया देते याची चाचपणी करतात. कृषी कायद्याच्या विधानाबाबत हेच झालं. भाजपाच्या एका खासदाराने कृषी कायदे पुन्हा लागू करण्यासंदर्भात विधान केलं. खरं तर याबाबत पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. जर पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा जर हे कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला, तर इंडिया आघाडी यांच्या विरोधात एकजुटीने उभी राहिल”, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

हेही वाचा – Rahul Gandhi to Anna’s parents: ‘आमची मुलगी गुलामासारखं काम करत होती’, ॲनाच्या पालकांनी राहुल गांधीसमोर मांडली खंत

कंगना रणौत यांनी माफीनाम्यात नेमकं काय म्हटलं?

“काही दिवसांपासून माध्यमांनी मला कृषी कायद्यासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यावर बोलताना मी असं सुचवलं होतं की, शेतकऱ्यांनी कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करायला हवं. मात्र, माझ्या या विधानावर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी कृषी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याला अनेक लोकांनी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर अतिशय सहानुभूतीपूर्वक पंतप्रधान मोदी यांनी ते कृषी कायदे मागे घेतले होते. त्यामुळे माझ्यासह सर्वच कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाचा मान ठेवला पाहिजे. मला देखील हे लक्षात घ्यायला हवं की, मी आता एक कलाकार नाही, तर भाजपाची एक कार्यकर्ती देखील आहे. त्यामुळे माझे मत हे माझं नसलं पाहिजे, ती माझ्या पक्षाची भूमिका असली पाहिजे. मात्र, तरी माझ्या विधानामुळे कोणी दुखावलं असेल तर मला माफ करा. मी माझे शब्द परत घेते”, असं कंगना रणौत म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi criticized narendra modi kangana ranauts statement three farm law spb