सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काल राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. दरम्यान, खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पाहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकावर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच अदाणी आणि मोदींच्या संबंधावर प्रश्न विचारल्यानेच माझ्याविरोधात कारवाई करण्यात आली, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले राहुल गांधी?
देशात आज लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची उदाहरणं रोज बघायला मिळतात. मी संसंदेत मोदी आणि अदाणींच्या संबंधावर प्रश्न विचारले होते. त्याचे पुरावेदेखील सादर केले होते. अदाणींच्या कंपनींमध्ये २० हजार कोटी कोणी गुंतवले? असा थेट प्रश्न मी विचारला होता, त्यामुळे माझी खासदारकी रद्द करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच माझी खासदारकी रद्द झाली, तरी मी गप्प बसणार नाही. मी मोदी सरकारला प्रश्न विचारणं बंद करणार नाही. मी त्यांना घाबरत नाही. असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना, देशाच्या लोकशाहीचं, देशातील संस्थांचं रक्षण करणे, देशातील गरीब लोकांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवणं आणि पंतप्रधानांशी असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेणाऱ्या अदाणींसारख्या लोकांबद्दल सत्य बोलणं हे माझे काम आहे. मी मोदी सरकारच्या धमक्यांना आणि आरोपांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – VIDEO : “महात्मा गांधींकडे कोणतीही पदवी नव्हती, तरीही…”; जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!
दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदींना चोर म्हणून ओबीसींचा अपमान केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. या आरोपांनाही राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं. मी भारत जोडो यात्रेदरम्यान सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चाललो. माझ्या यात्रेत सर्वच समाजाचे लोक सहभागी झाले होते. मुळात हा ओबीसीचा विषयच नाही. हा अदाणी आणि मोदींच्या संबंधाचा विषय आहे. ओबीसींना पुढे करत भाजपा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी कितीही आरोप केले, तरी मी त्यांना प्रश्न विचारणं बंद करणार नाही, असेही ते म्हणाले.