Rahul Gandhi राहुल गांधी यांनी आज लोकसभेत भाषण करताना पुन्हा एकदा संविधानाची प्रत दाखवली. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र लोकसभेला तसं घडलं नाही. पंतप्रधान मोदी संविधानासमोर वाकले त्याचा आम्हाला आनंद आहे असाही टोला राहुल गांधींनी लगावला.
काय म्हणाले राहुल गांधी?
भाजपात ओबीसी खासदार आहेत, दलित खासदार आहेत, आदिवासी खासदार आहेत. मात्र त्यांचं तोंड शिवलं गेलं आहे. ते सत्ताधाऱ्यांमध्ये बसले आहेत. त्यामुळे त्यांचं तोंड शिवलं गेलं आहे. जातनिहाय जनगणना होणं खूप आवश्यक आहे असंही राहुल गांधी म्हणाले त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी चांगलाच गदारोळ घातला. राहुल गांधी ओबीसी ओबीसी करत आहेत त्यांना पंतप्रधानांचा चेहरा दिसत नाही का? असा प्रश्न किरण रिजेजू यांनी विचारला आहे.
देशात बदल, क्रांती घडवायची असेल तर जातनिहाय जनगणना आवश्यक-राहुल गांधी
यानंतर राहुल गांधी म्हणाले की बदल घडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. तसंच आपल्या देशाचं संविधानही आवश्यक आहे. निवडणुकीच्या आधी तुम्ही ४०० पारचा नारा दिला होता. तुम्हाला संविधान बदलायचं होतं म्हणून तो नारा दिला गेला होता. मात्र लोकसभेतील निवडणूक निकालानंतर मला हे पाहून आनंद झाला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानापुढे नतमस्तक होत संविधानाला नमस्कार केला. संविधानापुढे ते वाकले याचा आनंद मलाच नाही काँग्रेसच्या प्रत्येकाला झाला. आम्ही देशाला समजावून सांगत होतो की कुणीही येऊद्या कितीही मोठी शक्ती असू देत संविधानाला कुणीही काहीही करु शकत नाही. असं राहुल गांधी म्हणाले.
मोहन भागवत यांच्यावर राहुल गांधीची टीका
मला माहीत आहे मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे मुळीच आवडलं नाही. कारण मोहन भागवत म्हणाले होते भारताला स्वातंत्र्य १९४७ मध्ये नाही मिळालं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं जेव्हा राम मंदिर उभं राहिलं. मात्र एक लक्षात घ्या आम्ही संघाचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. संविधानावरच हा देश चालणार आहे असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना समज दिली. ते म्हणाले सभागृहाचे जे सदस्य नाहीत त्यांची नावं या ठिकाणी घेऊ नका. नियमांचं पालन करणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्यावर राहुल गांधी म्हणाले की मोहन भागवत यांचं वक्तव्य काय होतं ते पाहा. आम्ही हा मुद्दा पटलावर ठेवतो आहोत असं राहुल गांधी म्हणाले.