नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी म्हणतात की, ते देवाचा अवतार आहेत. कदाचित नोटाबंदीसारखे लोकविरोधी निर्णय घेण्याचा ‘आदेश’ वरून आला असेल. खटाखट-खटाखट आदेश आले असतील, त्याचे मोदींनी पालन केले असेल’, अशी उपहासात्मक टीका गांधी यांनी केली. ‘नीट’ व ‘नेट’ पेपरफुटीवरूनही केंद्र सरकारवर राहुल गांधींनी शरसंधान साधले. ‘नीट’ ही व्यावसायिक नव्हे तर, व्यापारी परीक्षा झाली आहे. गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर श्रीमंतीच्या आधारावर ही व्यवस्था चालते. नीटवद्वारे श्रीमंत विद्यार्थ्यांना वैद्याकीय क्षेत्रात प्रवेश देण्यासाठी निर्माण झालेली ही कोटापद्धती आहे. ७ वर्षांमध्ये ७० वेळा पेपरफुटी झाली. या सगळ्याचा उल्लेख राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नाही’, असे राहुल गांधी म्हणाले.
‘अग्निवीर’वरून खडाजंगी
‘अग्निवीर’ योजनेतून भरती झालेला जवान शहीद झाला तर कुटुंबीयांना नुकसानभरपाईही दिली जात नाही. अग्निवीरांना निवृत्तिवेतन नाही, सुविधाही नाहीत. नोटाबंदीप्रमाणे अग्निवीरदेखील मोदींच्या डोक्यातून आलेली कल्पना असून लष्कराची नव्हे, असा आरोप राहुल गांधींनी केला. त्यावर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप नोंदवला. ‘शहीद जवानांच्या कुटुंबाला एक कोटीचे अर्थसाह्य दिले जाते. ही योजना संरक्षण क्षेत्रातील १५८ संस्था-संघटनांशी चर्चा करून लागू केली आहे. ब्रिटन व अमेरिकेतही अशा स्वरूपाची योजना आहे’, असे स्पष्टीकरण सिंह यांनी यावेळी दिले.
हेही वाचा >>>“केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, लोकसभेतील पहिल्याच भाषणात अमोल कोल्हेंची मागणी; म्हणाले…
अयोध्येच्या निकालावरून टोलेबाजी
फैजाबाद मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराच्या पराभवाबद्दल राहुल गांधींनी टोलेबाजी केली. ‘लोकांची दुकाने, जमिनी हिसकावून घेतल्या. त्यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. लोकांमध्ये भय निर्माण केले,’ असा आरोप गांधी यांनी केला. मणिपूरला तर भाजपने हिंसेच्या दरीत लोटले आहे. तिथे मोदी एकदाही गेले नाहीत. शेतकऱ्यांवर भाजपने दहशतवादी असल्याचा आरोप केला. भाजपने देशाला भयाचे पॅकेज दिले आहे’, असा गंभीर आरोप गांधींनी केला.
नोटाबंदीमुळे फक्त अदानी-अंबानींसारख्या उद्याोजकांचे भले झाले. छोटे उद्याोग संपले, रोजगार नष्ट झाले. जीएसटीसारखी करप्रणाली तर फक्त अदानी-अंबानीसारख्या अब्जाधीशांसाठीच केली गेली. – राहुल गांधी</strong>, विरोधी पक्षनेते