लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंदर्भात झालेल्या समितीच्या बैठकीनंतर काही तासांमध्ये सोमवारी रात्री उशिरा नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा करण्यात आली. इतक्या घाईघाईने केलेल्या निवडीला समितीचे सदस्य व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र विरोध केला आहे.
‘समितीच्या रचनेला आणि प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जात असताना आणि ४८ तासांपेक्षा कमी वेळात त्यावर सुनावणी होणार असताना, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री नवीन मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याचा निर्णय घेणे हे अपमानजनक आणि असभ्य आहे’, अशी टीका राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवड समितीची सोमवारी बैठक झाली. त्यामध्ये राहुल गांधींनी तातडीने निवडणूक आयुक्तांच्या निवडीला विरोधक केला व त्यासंदर्भातील आक्षेपपत्रही बैठकीमध्ये सादर केले.
राहुल गांधी यांचा आक्षेप
कोणत्याही प्रशासकीय हस्तेक्षपाशिवाय स्वतंत्रपणे निवडणूक आयुक्तांची निवड होणे गरजेचे होते. मात्र, या मूलभूत बाब देखील केंद्र सरकारने पाळलेली नाही. म्हणूनच मी मोदी व शहांच्या बैठकीमध्ये माझे आक्षेपपत्र सादर केले होते, असे राहुल गांधींनी ‘एक्स’वरून स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, मोदी सरकारने निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत लाखो मतदारांच्या चिंता वाढवल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.