नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची निमंत्रणाअभावी गैरहजेरी, चीनने लडाखमध्ये बळकावलेला कथित भूभाग, ‘मेक इन इंडिया’चे अपयश, सरसंघचालकांचे स्वातंत्र्यासंदर्भातील वादग्रस्त विधान, भाजपमधील ओबीसी खासदारांची कोंडी अशा तमाम मुद्द्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी सभागृहात केंद्र सरकारला चहुबाजूंनी घेरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी चौफेर फटकेबाजी करत असताना, पंतप्रधान मोदी सभागृहात हजर होते. त्यामुळे सत्ताधारी सदस्य कमालीचे अस्वस्थ झाले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे मोदींच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी गेले होते, असा आरोप राहुल गांधींनी केला. मात्र, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही ‘एक्स’वरून राहुल यांचा आरोप फेटाळला.

भाजपमधील ओबीसींची कोंडी!

भाजपमध्येही ओबीसी खासदार आहेत पण, त्यांना बोलण्याची मुभा नाही. भाजपच्या राज्यामध्ये ओबीसींना संधी मिळत नाही असा आरोप राहुल यांनी केला. त्यावर, ‘पंतप्रधान स्वत: ओबीसी असून तुम्हाला ते दिसत नाहीत का’, असा प्रतिसवाल भाजपच्या सदस्यांनी केला. संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली.

राहुल गांधी खोटे दावे करून जगभरात भारताची प्रतिमा मलिन करत आहेत. २०२४मधील अमेरिकेतील दौऱ्यामध्ये मोदींच्या आमंत्रणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मोदी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहात नाहीत हे सर्वांना माहिती आहे. – एस जयशंकर, परराष्ट्रमंत्री

आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो तर, मोदींना आमंत्रण मिळावे यासाठी केंद्र सरकारला जयशंकर यांना अमेरिकेला पाठवावे लागले नसते. उलट, अमेरिकेच्या अध्यक्षांनीच भारतात येऊन मोदींना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले असते. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा

खरगेंच्या विधानामुळे गदारोळ

महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो भाविकांचा बळी गेल्याचा दावा राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सभागृहात केला. या वादग्रस्त विधानावर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत सभागृहात प्रचंड गदारोळ केला. सभापती जगदीप धनखड यांनी खरगेंना त्यांचे विधान मागे घेण्याची विनंती केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेतील भाषणामध्ये खरगेंनी कुंभमेळ्यातील मृतांचा आकडा केंद्र सरकार लपवत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. या चेंगराचेंगरीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला असावा असा माझा अंदाज आहे. माझे म्हणणे चुकीचे असेल तर केंद्र सरकारने मृतांचा नेमका आकडा प्रसिद्ध करावा असे खरगे म्हणाले. ‘‘विरोधी पक्षनेत्यांनी हजारोंचा आकडा दिला आहे. तुम्ही सभागृहात जे बोलता ते अत्यंत महत्त्वाचे असते. तुमच्या बोलण्याने सर्वांना धक्का बसला आहे,’’ असे सभापती धनखड म्हणाले.