नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेदरम्यान लोकसभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुमारे दीड तासाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरकारची धोरणे, भाजप यांच्यावर हल्लाबोल केला. विशेष म्हणजे मोदी यांच्यासह तब्बल नऊ ज्येष्ठ मंत्र्यांनी गांधी यांच्या भाषणादरम्यान हस्तक्षेप केला. गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच संसद सभागृहात विरोधकांच्या शाब्दिक माऱ्यापुढे सत्ताधाऱ्यांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचे चित्र यानिमित्ताने दिसले.

राहुल गांधींनी महादेव, प्रेषित मोहम्मद, येशू ख्रिास्त, गुरू नानक अशा विविध धर्मांतील प्रेषित, धर्मगुरू व महापुरुषांची चित्रे असलेले फलक आणले होते. ‘या महापुरुषांनी घाबरू नका, दुसऱ्याला भीती दाखवू नका, अशी शिकवण दिली होती. मात्र, भाजप देशभर अल्पसंख्याकांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देत आहे’, असा आरोप करताना भाजपमध्येही भयाचे वातावरण असल्याचा दावा केला. स्वत:ला हिंदू म्हणविणारे भाजपवाले हिंसा आणि द्वेष पसरवित आहेत, ते हिंदू असूच शकत नाहीत असे गांधी म्हणताच पंतप्रधानांनी उभे राहून ‘अख्ख्या हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवणे हे अत्यंत गंभीर आहे’, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर ‘भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे अख्खा हिंदू समाज नव्हे’ असे बिनतोड उत्तर देत गांधी यांनी हा युक्तिवाद तितक्याच ताकदीने खोडून काढला. दुसऱ्यांदा हस्तक्षेप करताना, ‘संविधानाने विरोधी पक्ष नेतेपदाचा आदर करण्यास मला शिकवले आहे’, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>ईशनिंदा केल्याप्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयाकडून ख्रिश्चन व्यक्तीला मृत्यूदंड, प्रार्थनासथळं व घरं पेटवणारे मात्र मोकाट

राहुल गांधींनी आपल्या भाषणात अहिंसा, हिंदू समाज, राम मंदिर-अयोध्या, अग्निवीर, नोटाबंदी, शेतकरी-कृषी कायदे, महागाई, महिलांचे प्रश्न, पेपरफुटी अशा असंख्य मुद्द्यांवरून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकार, मोदी-शहा आणि भाजपच्या धोरणांचे वाभाडे काढले. भाषणामध्ये भाजपच्या सदस्यांनीच नव्हे, तर वरिष्ठ मंत्र्यांनीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांच्या भाषणावेळी अमित शहा वा राजनाथ सिंह यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री क्वचितच हस्तक्षेप करतात. या वेळी मात्र गांधींचे आरोप तात्काळ खोडून काढण्याची स्पर्धाच केंद्रीय मंत्र्यांमध्ये लागल्याचे चित्र होते! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन-चार वेळा आक्षेप घेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांना, ‘राहुल गांधी खोटे बोलत असून त्यांना अडवले जावे’, अशी विनंती केली. हिंदूंवरील टिप्पणीबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. भाजप भय निर्माण करत असल्याच्या आरोपावर ‘१९८४ च्या दंगलीत शिखांची कत्तल करण्यात आली. काँग्रेसला दहशत आणि भयाबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही’, असे प्रत्युत्तर शहा यांनी दिले. गांधींनी ‘अग्निवीर’चा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन वेळा हस्तक्षेप केला. त्याबरोबरच भूपेंद्र यादव, शिवराजसिंह चौहान, पीयूष गोयल, किरेन रिजिजू, प्रल्हाद जोशी, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्रसिंह शेखावत अशी मंत्र्यांची फौज सातत्याने हस्तक्षेप करून गांधींचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न करत होती. गांधींनी सभागृहात अनेक खोटे आरोप केले असून त्यांनी पुरावे द्यावेत अन्यथा सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही शहांनी लोकसभाध्यक्षांकडे केली.

महापुरुषांनी अहिंसा आणि भयमुक्त समाजाची शिकवण दिली. मात्र स्वत:ला हिंदू म्हणवणारे फक्त हिंसा, द्वेष, भीती पसरवत आहेत. तुम्ही (भाजप) हिंदू असूच शकत नाही.- राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

या देशात लाखो लोक स्वत:ला हिंदू मानतात. ते हिंसा घडवतात का? हिंसेला कुठल्याही धर्माशी जोडणे योग्य नाही. काँग्रेसने देशावर आणीबाणी लादून लोकांमध्ये भय निर्माण केले. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री