काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करणार आहेत. आपल्या प्रवासात ते स्थानिक लोकांशी संवाद साधत असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आपल्या या यात्रेत ते स्थानिक नेत्यांशीही चर्चा करत असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या ही यात्रा कर्नाटकमध्ये असून यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) लक्ष्य केले आहे. ते कर्नाटकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >>> “नुसतं माफी मागून…”, ब्राह्मणांसंदर्भात मोहन भागवतांच्या विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!
संघाने ब्रिटिशांना मदत केली. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. “माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिशांना मदत केलेली आहे आणि सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घ्यायचे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भारतीय जनता पार्टी कोठेही नव्हती. हे सत्य भाजपा लपवून ठेवू शकत नाही. काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनीच भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला,” असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा >>> सोनिया गांधी ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी; कर्नाटकात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
राहुल गांधी यांनी त्यांच्यावर होत असलेली टीका आणि त्यांच्या उभारण्यात आलेल्या प्रतीमेवरही भाष्य केले. “माझी चुकीची प्रतीम उभी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली मोठी यंत्रणा कामाला लावण्यात आलेली आहे, मी वेगवेगळ्या कल्पक योजना घेऊन आलो, ज्याचा भाजपा आणि आरएसएसला नेमहीच त्रास झालेला आहे. माझी चुकीची प्रतिमा उभी करण्यासाठी हजारो कोटी रुपये तसेच शक्तीचा वापर करण्यात आला. माझी उभी करण्यात आलेली प्रतीमा चुकीची आहे. हे काम आगामी काळातही असेच सुरू राहणार आहे, कारण हे करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र आर्थिकदृष्या फार सक्षम आहे, असे राहुल गांधी म्हणाले.