काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी संसदेने रद्द केली आहे. यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेससह एकत्र आलेल्या विरोधकांनी मोदी सरकारला या मुद्द्यावरून घेरण्यास सुरूवात केली आहे. आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षाच्या तमाम नेत्यांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला आहे. सोनिया गांधी यांनीही या आंदोलनाला साथ दिली. काळ्या बॉर्डरची साडी नेसून त्या संसदेत आल्या. अदाणी आणि राहुल गांधी या दोन्ही मुद्द्यांवरून संसदेत हंगामा झाला. ज्यानंतर कामकाज स्थगित करण्यात आलं.
राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये आज कामकाज सुरू होताच गौतम अदाणी आणि राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणं यावरून हंगामा झाला. ज्यानंतर लोकसभा ४ वाजेपर्यंत तर राज्यसभा २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
काँग्रेसने बोलावली विरोधकांची बैठक
काँग्रेस या आधी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, IUML, एमडीएमके, केसी, टीमसी, आरएसपी, आप, शिवसेना ठाकरे गट या पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या कक्षात ही बैठक पार पडली. या बैठकीला आलेल्या नेत्यांमध्येही बहुतांश नेते हे काळे कपडे घालूनच आले होते.
यावेळी काँग्रेस खासदार सौरव गोगोई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधीचं सदस्यत्व यासाठी रद्द केलं कारण ते अदाणींवर बोलू पाहात होते. राहुल गांधींवर आरोप करण्यात आले. त्यांच्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले पण त्यांना एकदाही बोलू दिले गेले नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार निषेधार्हच आहे. काँग्रेस खासदार रंजीत रंजन म्हणाले लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. लोकसभेत सत्ताधारी हे विरोधकांचा आवाज दाबू पाहात आहेत. जर घोटाळा झाला तर त्यावर बोलायचं नाही का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.