काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंच पायी फिरत आहेत. सध्या भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून काश्मीरमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही त्यांच्यासमवेत यात्रेत सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सध्या देशात चर्चेचा विषय ठरले आहेत. सत्ताधाऱी भाजपाकडून राहुल गांधींवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यादरम्यान, ‘करली टेल’ राहुल गांधींच्या घेतलेल्या एका मुलाखतीमधून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या या मुलाखतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुल गांधींच्या बेडशेजारी आहे रुद्राक्ष, बुद्धाचा फोटो आणि..
या मुलाखतीमध्ये राहुल गांधींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर राहुल गांधींनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. त्यावेळी झोपताना राहुल गांधींच्या बेडशेजारी काय असतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी बेडशेजारच्या ड्रॉवरमध्ये रुद्राक्ष असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. “माझ्या बेडशेजारी एक ड्रॉवर आहे. त्यात माझा पासपोर्ट, काही आयडी आणि काही धार्मिक गोष्टी आहेत. त्यात रुद्राक्ष आणि काही फोटो आहेत. बुद्धा, शिवा यांचे फोटो आहेत. माझं पाकिट आहे. माझा फोन आहे. पण झोपताना मी माझा फोन बाजूला ठेवून देतो”, असं राहुल गांधी म्हणाले.
पहिली नोकरी, पहिला पगार आणि खर्च!
दरम्यान, आत्ता जरी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या आणि भविष्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात असलं, तरी त्यांनी पहिली नोकरी लंडनमध्ये केल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. “माझी पहिली नोकरी लंडनमध्ये होती. मॉनिटर नावाच्या कंपनीत मी कामाला लागलो होतो. ती एक सल्लागार कंपनी होती. मला पहिला पगार किती मिळाला होता तेही मला आठवतंय. त्या काळात तो पगार मला खूप वाटायचा. ते फार विचित्र वाटेल आता. मी तिकडे राहायचो. त्यामुळे ती रक्कम घरभाडं आणि इतर गोष्टींमध्ये खर्च व्हायची. तेव्हा २५०० किंवा ३००० पौंड पगार मिळायचा. तेव्हा माझं वय साधारण २५ असेल”, असं राहुल गांधी म्हणाले.
ऑक्सफर्ड, हार्वर्डमध्ये शिक्षण
राहुल गांधींनी ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतल्याचं या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. “मी एका वर्षासाठी सेंट स्टिफनला होतो. तिथे मी इतिहास शिकलो. त्यानंतर मी हार्वर्ड विद्यापीठात गेलो. तिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. पण त्यादरम्यान बाबांचं निधन झालं आणि मला तिथून परत यावं लागलं. कारण तिथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. हार्वर्डमधून परतल्यानंतर मी अमेरिकेत फ्लॉरिडामधल्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मी केम्ब्रिजमध्ये माझं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्याला मास्टर्स इन फिलॉसॉफी म्हणतात”, असं ते म्हणाले.