खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला. भाजपाकडून सातत्याने लोकशाहीवर हल्ला केला जात आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. मला अपात्र केलं तरी तुम्ही मला घाबरवू शकत नाही. माझा आवाज रोखू शकत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी यांचे विमानातील फोटो आणि इतर पुरावे सादर करून मी संसदेत सवाल विचारले होते. पण संसदेतील माझं भाषण काढून टाकण्यात आलं, त्यानंतर मी सभापतींना प्रत्येक मुद्द्यांसह पत्र लिहिलं. त्यामध्ये अदाणींना नियम बदलून सहा विमानतळं देण्यात आली, असं सांगितलं. त्याबरोबर मी रुल्सची एक प्रतही दिली. ज्यामध्ये बदल करण्यात आला होता. पण त्यांना पत्र लिहूनही काही फरक पडला नाही. त्यानंतर संसदेत काही मंत्र्यांनी माझ्याबद्दल खोटं सांगितलं की, मी परकीय देशाकडून मदत घेतली. पण अशी मी कोणतीही गोष्ट केली नाही,” असंही राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं.

अपात्र ठरवण्याचा घटनाक्रम सांगताना राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा एखाद्या सदस्यावर संसदेत आरोप लावले जातात, तेव्हा त्या सदस्याला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. त्यासाठी सभापतींना मी दोन पत्रं लिहिली, पण त्याची उत्तरं मिळाली नाहीत. त्यानंतर मी सभापतींच्या दालनात गेलो, भाजपाच्या नेत्यांनी माझ्यावर खोटा आरोप लावला आहे, तुम्ही मला बोलू का देत नाहीत? असं विचारलं. तेव्हा सभापती हसले आणि मी करू शकत नाही, असं म्हणाले. त्यानंतर काय झालं ते सगळ्यांनी पाहिलं.”

“पण मी प्रश्न विचारणं बंद करणार नाही. नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांचा काय संबंध आहे? अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्याद्वारे गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? हा प्रश्न मी विचारत राहीन. मला या लोकांची भीती वाटत नाही. त्यांना जर वाटत असेल की माझं सदस्यत्व रद्द करून, मला धमकावून किंवा मला तुरुंगात पाठवून ते माझा आवाज बंद करू शकतील, तर मी घाबरणारी व्यक्ती नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि पुढेही लढत राहीन,” अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

मी फक्त एकच प्रश्न विचारला की, अदाणींच्या शेल कंपन्या आहेत. त्यात शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कुणी गुंतवले? हा अदाणींचा पैसा नाही. त्यांचा पायाभूत सुविधा उभारण्याचा व्यवसाय आहे. हा पैसा दुसऱ्या व्यक्तीचा आहे. ती व्यक्ती कोण आहे? त्याला शोधा आणि तुरुंगात टाकावं, एवढीच माझी मागणी आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi first press conference after disqualification gautam adani and narendra modi relation 20000 crore scam rmm