Rahul Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं आहे कारण गुरुवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप झाला आहे. मला राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) धक्का दिला त्यामुळे मला जखम झाली आणि डोक्याला मार लागला असं प्रताप चंद्र सारंगी यांनी म्हटलं आहे. दरम्यान या आरोपानंतर राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारंगी यांचा आरोप काय?

मी पायऱ्यांवर उभा होतो, त्यावेळी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी एकाला धक्का दिला. ते माझ्या अंगावर पडले आणि मी राहुल गांधींमुळे जखमी झालो असं सारंगी यांनी म्हटलं आहे. सारंगी यांना आता रुग्णालयात नेण्यात आलं आहे तसंच या प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आली आहे. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

“आम्ही मकर द्वाराने संसदेच्या आत चाललो होतो. त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे.” असं राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) म्हटलं आहे.

मल्लिकार्जुन खरगेंनाही धक्काबुक्की झाली-राहुल गांधी

यानंतर राहुल गांधी म्हणाले मी धक्काबुक्की केलेली नाही. मला धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवलं. राहुल गांधी म्हणाले की आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, आम्ही पायऱ्यांवर उभे होतो. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपाचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

इंडिया आघाडीचं आंदोलन

इंडिया आघाडीचे खासदार यांनी संसदेच्या प्रांगणात आंदोलन सुरु केलं आहे. दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यानंतर इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक झाले आहेत. इंडिया आघाडीकडून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. इंडिया आघाडीचे खासदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हाती घेऊन घोषणा दिल्या. तसंच हे सरकार संविधानविरोधी असल्याचाही आरोप पुन्हा एकदा करण्यात आला. त्याच दरम्यान ही घटना घडली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi gave clarification about allegation against him by bjp mps scj