काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रा काढली आहे. दक्षिण भारतातून निघालेली ही यात्रा आता श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. श्रीनगरमधील लाल चौकात आज (रविवारी) दुपारी १२ वाजता राहुल गांधी यांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवला. राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वज फडकवताच स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन देखील केलं. राहुल यांनी तिरंगा फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. दरम्यान, या कार्यक्रमावरून राहुल गांधी आता ट्रोल होऊ लागले आहेत.
लाल चौकात राहुल गांधी राष्ट्रध्वज फडकवणार असल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. राष्ट्रध्वज ज्या ठिकाणी फडकवला तिथे राहुल गांधी यांचे मोठे कटाऊट देखील लावले होते. हे कटाऊट राष्ट्रध्वजापेक्षा मोठे असल्याने सोशल मीडियावर राहुल गांधींना ट्रोल केलं जात आहे. तसेच काँग्रेसने राष्ट्रध्वजापेक्षा राहुल गांधींचं मोठं कटाऊट का लावलं असा सवाल देखील सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
राहुल गांधी ट्रोल
राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकवल्यानंतर एशियन न्यूज इंटरनॅशनलने त्याचा फोटो आणि व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला. या ट्वीटवर नकारात्मक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “ही चांगली गोष्ट आहे पण राहुल गांधी यांचं फ्लेक्स राष्ट्रध्वजापेक्षा मोठं का आहे?” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे “झेंड्यापेक्षा मोठा तपस्वी”.
पंडित नेहरुंशी तुलना
दरम्यान, एका युजरने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आणि राहुल गांधी यांचा तिरंगा फडकवतानाचा एक फोटो शेअर केला आहे. युजरने दावा केला आहे की, नेहरूंनी लाल चौकात तिरंगा फडकवला होता तेव्हाचा हा फोटो आहे.