संसदेत आज राहुल गांधींनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा विरोधी पक्षनेते म्हणून भाषण केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचं उत्तर देताना राहुल गांधींनी शंकराचा फोटो दाखवला आणि सांगितलं की आमची प्रेरणा भगवान शंकर आहेत. आम्ही कुणालाही घाबरत नाही. त्यांची जी मुद्रा आहे तशीच इतर धर्मांमधल्या महापुरुषांचीही मुद्रा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या हिंदूबाबतच्या वक्तव्यावरुन लोकसभेत गदारोळ
राहुल गांधी यांनी मोदींच्या भाषणाचं उदाहरण दिलं आणि म्हणाले, “मोदी एकदा त्यांच्या भाषणात म्हणाले होते की भारताने कधीही कुणावर हल्ला केला नाही. याचं कारण आहे ते म्हणजे आपला हिंदुस्थान हा अहिंसा मानणारा देश आहे. आपल्या देशात होऊन गेलेल्या महापुरुषांनी हा संदेश दिला आहे की घाबरवू नका आणि घाबरु नका. भगवान शंकरही हेच म्हणतात घाबरु नका, घाबरवू नका त्यानंतर ते त्रिशूळ जमिनीवर मारतात. दुसरीकडे जे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा करतात आणि तिरस्कार पसरवतात. तुम्ही हिंदू नाहीच. हिंदू धर्मात हे स्पष्ट लिहिलं आहे की तुम्हाला सत्याची कास सोडायची नाही.”
हे पण वाचा- “पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन करताना आपण झुकलात”, राहुल गांधींचा आरोप; ओम बिर्लांचं तिखट उत्तर
राहुल गांधींनी हे वक्तव्य करताच काय घडलं?
राहुल गांधींनी हे वक्तव्य करताच संसदेत गदारोळ झाला. नरेंद्र मोदी म्हणाले की हिंदू समाजाला अशाप्रकारे हिंसक म्हणणं ही बाब गंभीर आहे. त्यावरही राहुल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदी किंवा भाजपा म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही. हिंदू शब्दाचा अर्थ भाजपा, आरएसएस किंवा नरेंद्र मोदी नाही. या ठिकाणी सगळेच हिंदू आहेत. या सगळ्यानंतर आता राहुल गांधींवर चौफेर टीका सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राहुल गांधींनी लोकसभेत हिंदूंचा अपमान केला आहे. सगळे हिंदू हिंसा करतात हे वक्तव्य त्यांनी केलं. या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सगळ्या हिंदू समुदायाला हिंसक म्हणणं हा संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान आहे. राहुल गांधींनी हे त्यांचं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे. लोकसभेत त्यांनी सगळ्या हिंदू समाजाची माफी त्यांनी मागितली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राहुल गांधींचं विधान आक्षेपार्ह आणि चुकीचं आहे. संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान त्यांनी केला आहे. लोकसभेत त्यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हणणं हा अपमान आहे. जाहीर माफी मागितली पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.