Rahul Gandhi भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्याचा राहुल गांधींनी चांगलाच समाचार घेतला. आज दिल्लीत काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी एक भाषण केलं. इंदिरा भवन या नावाने काँग्रेसचं नवं मुख्यालय ओळखलं जाणार आहे. इंदिरा भवनच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधींनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले राहुल गांधी?

महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागितली ती त्यांनी दिली नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.

मोहन भागवतांबाबत काय म्हणाले राहुल गांधी?

“मोहन भागवत हे दर दोन ते तीन दिवसांनी देशाला हे सांगत असतात की स्वातंत्र्यसंग्रामाबाबत त्यांचे विचार काय आहेत. त्यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य हा देशद्रोह आहे. त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ हाच होतो की संविधानाचं काही औचित्यच नाही. इंग्रजांच्या विरोधात जी लढाई देशाने केली त्याला काही अर्थ नाही.” मोहन भागवत असं म्हणाले होते की रामलल्लाची मूर्ती ज्या दिवशी राम मंदिरात स्थापन झाली ती तिथी उत्सव म्हणून साजरी करावी कारण त्यानंतर देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं. या वक्तव्याचा समाचार राहुल गांधींनी घेतला आहे.

तर मोहन भागवतांना अटक करण्यात आली असती-राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, मोहन भागवत सार्वजनिकपणे असं वक्तव्य करतात. जर दुसऱ्या एखाद्या देशात त्यांनी असं वक्तव्य केलं असतं तर त्यांना अटक झाली असती. तसंच त्यांच्यावर खटला भरवला गेला असता. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही असं म्हणणं हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. हा अपमान मोहन भागवत यांनी केला आहे. आता ही वेळ आली आहे की मोहन भागवत जी वायफळ बडबड करतात ती आपण ऐकणं बंद केलं पाहिजे. कारण आता लोकांना कळलं आहे की एकच एक वक्तव्य हे लोक अशाच प्रकारे बोलत राहतील आणि तेच खरं आहे असं ओरडत राहतील. असंही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस यांच्या विचारधारेला रोखू शकणारा पक्ष आहे-राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले हे दोन विचारांमधील द्वंद आहे. दोन विचारधारांममधील ही लढाई आहे. संविधान हा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे संघाचा विचार हा नेमका त्याच्या उलट आहे. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही, हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य भारतीयांचा अपमान करणारे असल्याचे गांधी म्हणाले. तसंच काँग्रेस या विचारधारेला रोखू शकणारा पक्ष आहे हे लक्षात ठेवा असंही राहुल गांधी म्हणाले.

तपास यंत्रणांच्या गैरवापरावर भाष्य

राहुल गांधी म्हणाले, आपल्या देशात तपास यंत्रणांचा गैरवाप केला जातो आहे. कारण ईडी, सीबीआय यांना एकच काम दिलं जातं ते म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांना घेरा आणि त्यांना तुरुंगात धाडा. तसंच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीची आम्ही मागतो आहोत ती माहिती दिली पाहिजे अशीही मागणी राहुल गांधींनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi hits out at rss chief mohan bhagwat true independence remark what did he say scj