काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची राहुल गांधी यांची ही पहिलीच इफ्तार पार्टी आहे. या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने विरोधी पक्षांना त्यांची एकजुट आणि ताकत दाखवण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षातील नेते या इफ्तार पार्टीत सहभागी झाले आहेत.

या पार्टीमध्ये मुख्य आकर्षणाचे केंद्र होते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. प्रणवदा मागच्या आठवडयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसमधून प्रचंड टीका करण्यात आली होती. इफ्तार पार्टीच्या निमंत्रितांमध्ये त्यांचे नाव नसल्याचेही वृत्त आले होते. मुखर्जी यांची संघाच्या कार्यक्रमानंतर राहुल गांधींबरोबरची ही पहिली भेट आहे.

राहुल गांधी यांनी या इफ्तार पार्टीचा फोटो टि्वटवर पोस्ट केला असून त्यामध्ये प्रणव मुखर्जी राहुल यांच्या शेजारी बसले असून दोघांमध्ये संवाद सुरु असल्याचे दिसत आहे. प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील या दोन माजी राष्ट्रपतींनी सहभागी होऊन आम्हाला सम्मानित केले असे राहुल यांनी त्यांच्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. या इफ्तारमुळे गांधी कुटुंब प्रणव मुखर्जींवर नाराज नसल्याचा संदेश गेला आहे. प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून आनंद शर्मा, सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि प्रणवदांची स्वत:ची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्यावर टीका केली होती.

Story img Loader