Rahul Gandhi Interaction with Indian Diaspora in US: लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधत आहेत. रविवारी त्यांनी डेलासमधील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी भारतीय राजकारण, त्यांची राजकारणाकडे बघण्याची भूमिका, भारत जोडो यात्रा अशा अनेक विषयांवर त्यांनी सविस्तर भाष्य केलं. यावेळी राजकीय नेत्याच्या कर्तव्याबाबत भाष्य करतानाच त्यांनी स्वत:च्या राजकीय भूमिकेविषयीही भाष्य केलं.
सगळ्याच मुद्द्यांवर तुम्ही भांडू शकत नाही, तुम्हाला विषय काळजीपूर्वक निवडावे लागतात, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
“आधी विषय ऐकून घेणं ही मूलभूत पायरी आहे. त्यानंतर त्यासंदर्भातलं सखोल विवेचन समजून घेता आलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक मुद्दा उपस्थित करून त्यावर वाद घालू शकत नाही. तुम्हाला महत्त्वाच्या विषयांची निवड करून त्यासाठी लढा देण्याची गरज आहे. तुम्ही तुमचा लढा फार काळजीपूर्वक निवडायला हवा. राजकीय धोरणाची किंवा व्यावसायिक धोरणाची एक सगळ्यात प्रभावी अशी व्याख्या म्हणजे तुम्ही काय करायला नको, हे व्यवस्थित समजून घेणं”, असं राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं.
भारत जोडो यात्रेबाबत राहुल गांधी म्हणाले…
दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान आलेला अनुभव शेअर केला. “या यात्रेदरम्यान पहिल्यांदाच देशाच्या राजकारणाची प्रेमाच्या कल्पनेशी सांगड घालण्यात आली. भारत जोडो यात्रेमुळे माझा माझ्या कामाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. आपला राजकारणाकडे, लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. अनेक देशांमध्ये तुम्हाला राजकीय वर्तुळात प्रेम या कल्पनेचा उल्लेखच आढळत नाही. मला आश्चर्य वाटतं की ही कल्पना इथे कशी कामी आली”, असं राहुल गांधी म्हणाले.
“भारत जोडो यात्रेदरम्यान मी राहुल गांधी म्हणून लोकांशी संवाद साधत नव्हतो. यात्रा जो संवाद माझ्याशी साधत होती, तोच संवाद मी लोकांशी करत होतो. मला हे समजण्यासाठी थोडा वेळ गेला. मला अचानक असं जाणवायला लागलं की माझ्या तोंडून जे काही निघतंय, ते तर वास्तवात लोक जे बोलतात तेच आहे. याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे माझं यात्रेदरम्यानचं ब्रीदवाक्य.. नफरत के बाजार में, मोहोब्बत की दुकान खोल रहा हूँ”, असं राहुल गांधी यावेळी संवादादरम्यान म्हणाले.
VIDEO : “राहुल गांधी ‘पप्पू’ नाहीत, तर…”; सॅम पित्रोदांचे विधान चर्चेत!
“कोणत्याही राजकीय व्यक्तीचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे लोकांच्या भावना ऐकून घेणं, त्या खोलात जाऊन समजून घेणं आणि त्या इतर लोकांकडे हस्तांतरीत करणं. यामागचा विचार म्हणजे देश काय म्हणतोय, देशाच्या काय भावना आहेत हे समजून घेणं”, असंही राहुल गांधींनी नमूद केलं.
© IE Online Media Services (P) Ltd