Rahul Gandhi’s Independence Day event: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ७८ वा स्वातंत्र्यदिन आज लाल किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ट म्हणजे दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच लोकसभेचा विरोधी पक्षनेता या सोहळ्यासाठी उपस्थित होता. दहा वर्ष लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता. राहुल गांधी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले असले तरी त्यांना बसायला मागच्या रांगेत जागा दिल्यामुळे सोशल मीडियावर वाद उद्भवला आहे. राहुल गांधी आज सकाळी पांढरा कुर्ता-पायजमा घालून लाल किल्ल्याच्या परिसरात आले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू ज्याठिकाणी बसले होते, तिथे मागे राहुल गांधी यांना बसण्यास जागा देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी अगदी पहिल्या रांगेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड बसल्याचे दिसत आहे. तर त्यांच्यामागे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खेळाडू बसले आहेत. यामध्ये मनू भाकेर, सरबज्योत सिंग, स्वप्निल कुसाळे यांचा समावेश आहे. तर बाजूला भारताचा कास्य पदक विजेता हॉकी संघ बसला आहे. त्यांच्या मागच्या रांगेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बसलेले दिसत आहे. त्यांच्या शेजारी हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पीआर श्रीजेश बसलेले दिसत आहे.

हे वाचा >> राहुल गांधी स्वातंत्र्यदिनाच्या सरकारी सोहळ्याला उपस्थित, १० वर्षांनी विरोधी पक्षनेत्याने ऐकलं पंतप्रधानांचं भाषण

राजशिष्टाचार नियमाप्रमाणे, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. त्यामुळे त्यांना नेहमी पहिल्या रांगेत बसण्याची जागा दिली जाते. यावेळी पहिल्या रांगेत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, शिवराज सिंह, अमित शाह आणि एस. जयशंकर बसले होते.

सरकारने काय उत्तर दिले?

राहुल गांधी यांना मागे बसण्याची जागा दिल्यानंतर सोशल मीडियावर वाद उद्भवला. यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण खात्याकडून या कार्यक्रमाचे नियोजन केले जात असते. राहुल गांधी यांना ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह बसण्याची जागा देण्यात आली होती. कुणाला कुठे बसण्यास जागा द्यावी, याचे सर्व निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेले असतात.

भाजपाचे दिवंगत नेते, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांना नेहमी पहिल्या रांगेत आसन दिले जात होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi independence day event seating triggers talk central government says kvg