Rahul Gandhi on Narendra Modi Gautam Adani : काँग्रेस खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात केलेल्या एका अनोख्या आंदोलनाची बरीच चर्चा होत आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदाणी यांच्याविरोधात आंदोलन केलं, त्यांचे पोस्टर हातात घेऊन निषेध नोंदवला. दोघांमधील कथित हितसंबंधांमुळे देशाचं नुकसान होत असल्याचा दावा केला. त्यानंतर राहुल गांधी दोन खासदारांबरोबर प्रसारमाध्यमांसमोर आले, ज्यांनी चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदाणींचे मुखवटे लावले होते. या खासदारांना बरोबर घेत राहुल गांधी यांनी मोदी व अदाणींमधील कथित हितसंबंधांविरोधात अनोखं आंदोलन केलं. तसेच राहुल यांनी या दोघांची मुलाखतही घेतली.
यावेळी राहुल गांधी यांनी मोदी-अदाणींचे मुखवटे घातलेल्या खासदारांना काही प्रश्न विचारले. राहुल गांधी म्हणाले, “तुमच्या हितसंबंधांबद्दल बोला”. त्यावर ते म्हणाले, “आम्ही दोघे मिळूनच सगळं करतो. २० वर्षांपासून आमची मैत्री आहे”. त्यावर राहुल गांधींनी विचारलं की “तुम्ही संसदेचं अधिवेशन का चालू देत नाही”. त्यावर ते दोघे म्हणाले, “आज अमित (केंद्रीय गृहमंत्री अमित शाह) आलेला नाही. तो आल्यावर सांगतो”.
राहुल गांधींचं अनोखं आंदोलन
अदाणींचा मुखवटा परिधान केलेला खासदार म्हणाला, “मी जे काही सांगतो ते हा (मोदी) सगळं करतो. मला वाटेल ते सगळं मी याला सांगतो आणि मग तो ते काम करतो. मला बंदरं हवी असतील तर ती देतो, विमानतळं देतो”. राहुल गांधींनी त्या दोघांना विचारलं की “आता काय बळकावणार आहात?” त्यावर ते म्हणाले, “आमची संध्याकाळी बैठक आहे. त्या बैठकीत अमितभाईसुद्धा आहे. तिथे सगळं ठरेल”. मोदींच्या मुखवट्याकडे बोट करत राहुल गांधी म्हणाले, “हा इतका चिंतेत का आहे?” त्यावर त्याचा दुसरा साथीदार (अदाणी) म्हणाला, “तो थोडा गंभीर आहे, त्याला कमी बोलायची सवय आहे”.