काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधील थौबल येथून आज सुरूवात झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वज दाखवून यात्रेला सुरूवात करण्यात आली. यावेळी आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. “२९ जून २०२३ रोजी मी मणिपूरला आलो होतो. त्यावेळी मी जे काही पाहिले, जे काही ऐकले. ते त्याआधी कधीच एकले किंवा पाहिले नव्हते. २००४ पासून मी राजकारणात आहे. पण त्यावेळी मी जे पाहिले, ते मणिपूर याआधी नव्हते. पण तरीही आजवर पंतप्रधान याठिकाणी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आलेले नाहीत. कारण त्यांना आणि भाजपाला मणिपूरशी काहीही देणेघेणे नाही. तुमचे दुःख त्यांचे दुःख नाही”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

भाजपा सरकारवर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले, “सरकारची व्यवस्था पूर्णपणे ढासळली होती. ज्याला आपण मणिपूर म्हणत होतो, २९ जून नंतर ते मणिपूर राहिले नाही. मणिपूर विभागला गेले. प्रत्येक ठिकाणी द्वेषाची पेरणी झाली. लाखो लोकांना याचा फटका बसला. अनेकांना जवळचे लोक गमवावे लागले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत एकदाही इथल्या जनतेचे अश्रू पुसण्यासाठी आलेले नाहीत. ही शरमेचे बाब आहे. कदाचित नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला मणिपूर भारताचा भाग आहे, हे माहीतच नसावे. तुमचे दुःख हे त्यांना स्वतःचे दुःख वाटत नाही.”

आम्ही जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत ४००० किमींचा प्रवास केला. द्वेष संपवून प्रेमाचा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला. धर्म, जातीला मागे टाकून प्रेम पसरविण्याचा प्रयत्न केला. हे अवघड काम होते, पण हा प्रयत्न करून चांगले वाटले, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

यावेळी यात्रेच्या पद्धतीमध्ये बदल केल्याबाबत राहुल गांधी यांनी सांगितले की, “लोकांनी पहिल्या यात्रेनंतर सांगितले होती की दक्षिण ते उत्तर यात्रा केलीच आहे तर पूर्व ते पश्चिम अशीही यात्रा करावी. माझी यावेळीही पदयात्रा करण्याची इच्छा होती. मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे आमच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळेच आम्ही हायब्रिड यात्रा काढत आहोत. काही वेळ बस आणि काही वेळ पदयात्रा करणे, असे आमचे नियोजन आहे.”

कशी असेल भारत जोडो न्याय यात्रा

मणिपूर ते मुंबई असा तब्बल ६,७१३ किलोमीटरचे अंतर ही यात्रा पार करणार आहे. सुमारे ६७ दिवसांच्या कालावधीत ११० जिल्हे, १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाईल. २० किंवा २१ मार्चला यात्रा मुंबईत यात्रेची समाप्ती होईल. मणिपूरहून नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र असा यात्रेचा प्रवासाचा मार्ग असेल. यात्रा उत्तर प्रदेशात सर्वाधिक ११ दिवस असेल. अमेठी, रायबरेली यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघांतून यात्रा जाईल.