“राहुल गांधींचा लखीमपूर खेरी येथील दौरा हा निव्वळ ‘राजकीय पर्यटना’चा एक नमुना आहे”, अशी टीका भाजपाकडून होत आहे. केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी शनिवारी (९ ऑक्टोबर) हे विधान केलं आहे. “जिथे जिथे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना संधी मिळते तिथे तिथे ते आपल्या राजकीय पर्यटनासाठी जातात. राहुल गांधींचा लखीमपूर खेरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही”, असं गिरीराज सिंह म्हणाले.

“माझा एक प्रश्न आहे. राहुल गांधींनी लखीमपूरमधील त्या घटनेत मारल्या गेलेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला भेट का दिली नाही? त्यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेट का दिली नाही?” असे सवाल गिरीराज सिंह यांनी माध्यमांशी बोलताना केले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी (६ ऑक्टोबर) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मृत शेतकरी लवप्रीत सिंह यांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या ८ जणांमध्ये ४ शेतकऱ्यांसह एक पत्रकार, दोन भाजपा कार्यकर्ते आणि एक ड्रायव्हर यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी (३ ऑक्टोबर) वाहनांच्या ताफ्याखाली चिरडून एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. हा ताफा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राचा होता. यामुळे देशात मोठा तणाव आणि उद्रेक पाहायला मिळाला. या प्रकरणानंतर आणि निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या दबावानंतर तब्बल आठवड्याभराने आता ११ तासांच्या चौकशीनंतर अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक करण्यात आली आहे.

Story img Loader