राष्ट्रीय स्तरावर काहीशी मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आता पक्षात फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांच्या गळ्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडू शकते. खरंतर यासंदर्भातले अंदाज याआधीच व्यक्त झाले आहेत. मात्र आता ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांची अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता काँग्रेसच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली ज्या बैठकीतच राहुल गांधी यांना अध्यक्ष म्हणून निवडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार होतं. मात्र आता मंगळवारी झालेल्या बैठकीत या विषयावर पुन्हा एकदा काँग्रेसच्या दिग्गजांचं एकमत झालं आहे. १५ ऑक्टोबरला सोनिया गांधी आपलं पद सोडतील आणि त्यानंतर राहुल गांधींचा काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा होईल,अशी माहिती समोर आली आहे.

२०१९ च्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागा असा सल्ला सोनिया गांधी यांनी दिला आहे. या निवडणुका राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लढवल्या जातील ही बाब उघड आहे. भारतातला एकसंधतेचा विचार सध्याचं सरकार संपवू पाहतंय तो टिकवण्यासाठी काँग्रेसला एकजुटीनं विरोधकांशी टक्कर द्यायला हवी असंही मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ए. के. अँटनी, पी चिदंबरम यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. आता राहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा दिल्यावर येत्या काळात ते पक्षाला आणखी किती पुढे घेऊन जातील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader