आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग आज राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.


वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, संध्याकाळच्या सुमारास दोघांची भेट झाली. दिल्लीतील शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली.  यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या भेटीचा तपशील अद्याप मिळालेला नाही पण शरद पवारांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधींसोबत चांगली चर्चा झाली, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असावी याबाबत राहुल गांधींशी चर्चा झाली असं ट्विट पवारांनी केलं आहे.

काय झालं बैठकीत –
महाराष्ट्रातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं जागावाटप जवळपास निश्चित झालं असून फक्त आठ जागांचा पेच बाकी आहे. पवार आणि राहुल गांधींच्या बैठकीत आठपैकी पाच जागांवर तोडगा निघाला असून 3 जागांचा निर्णय बाकी असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या 5 जागांमध्ये जालना, औरंगाबाद, भिंवडी, अहमदगरचा समावेश असल्याचं समजतंय. तर 3 जागांवर अजूनही बोलणी सुरू आहे. यात पुण्यातील एक महत्त्वाची जागा असल्याची माहिती आहे.

 

Story img Loader