लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल (४ जुलै) दिल्लीतील गुरु तेग बहादूर नगरात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची भेट घेतली आहे. देशाचा कणा असलेल्या मजूर कामगारांना त्यांच्या मेहनतीचा योग्य तो मोबदला मिळवून देणे आणि त्यांच्या जीवनाचा उचित सन्मान करणे हे काँग्रेसचे धेय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सर्व कामगारांशी चर्चा केली, त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि रोजंदारी कामगारांच्या संघटनांविषयी त्यांनी बातचित केली. याबद्दलची एक पोस्ट काँग्रेसच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.

असंघटित कामगार देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कामगारांसाठी काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये अनेक वेळा अनेक योजना जाहीर केल्या आहेत. मनरेगासारखी योजना या निवडणुकीच्या प्रचारात शहरातही राबवण्याचा मनोदय राहुल गांधी यांनी व्यक्त करून दाखवला होता.

स्वतः केले काम

दरम्यान, गुरु तेग बहादूर नगरमधील या कामगारांसह भेटीचे फोटो राहुल गांधींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राहुल गांधी स्वतः बांधकाम करणाऱ्या या कामगारांसह काम करताना दिसले. त्यांनी कामगारांचे फावडे आणि थापी हे साहित्य घेऊन प्रत्यक्ष काम केले असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. राहुल गांधी यांनी याआधीही अशाप्रकारे कामगारांच्या भेटी घेतल्या आहेत.

राहुल म्हणाले..

या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले, “आपल्या देशात मजूर कामगारांना कोणताही सन्मान दिला जात नाही. त्यांच्या मेहनतीचा आदर केला जात नाही, हे मी याधीही सांगितले आहे. रोज या मजुरांना कामाच्या शोधात फिरावे लागते.”

ते पुढे म्हणाले, “प्रचंड वाढलेल्या या महागाईच्या काळात रोजंदारी करून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईत जीवन जगताना या मजूर कामगारांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. रोजंदारीचे काम रोज मिळेल असेही काही नाही. त्यामुळे भारतातील मजूर कामगारांना त्यांचे हक्क आणि योग्य सन्मान मिळवून देणे माझ्या आयुष्याचे धेय आहे.”

हेही वाचा- ‘फर्जी’ वेबसीरिज पाहून बोगस नोटांचा छापखाना थाटला; सहा जणांना अटक! वाचा काय घडलं?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात भीषण चेंगराचेंगरी झालेल्या प्रकरणी १२३ भक्तांचा मृत्यू झाला होता. त्या मृतांच्या कुटुंबीयांची आज राहुल गांधींनी सांत्वनपर भेट घेतली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधींनी रुग्णालयालाही भेट दिली. या संदर्भातील माहिती काँग्रेसचे सरचिटणीस खासदार केसी वेणुगोपाल यांनी माध्यमांना दिली आहे.