लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं दिसत आहे. दोन्ही बाजूची नेतेमंडळी टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते आई सोनिया गांधींसमवेत त्यांची बहीण प्रियांका गांधी यांची एक रेसिपी किचनमध्ये तयार करताना दिसत आहेत. यावेळी दोन्ही मायलेकांमध्ये हलक्या फुलक्या वातावरणात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ३१ डिसेंबर रोजी सकाळी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या घरातल्या किचनमध्ये राहुल गांधी सोनिया गांधी काम करत असल्याचं दिसत असून त्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा होताना दिसत आहे. यावेळी राहुल गांधींनी गप्पांमध्ये भाजपाचाही उल्लेख केल्यानंतर सोनिया गांधींनीही त्यांना तितक्याच मिश्किलपणे दाद दिली!

काय बनवतायत राहुल गांधी?

या व्हिडीओमध्ये राहुल गांधी व सोनिया गांधी सायट्रस फ्रूट जॅम बनवत असून प्रियांका गांधींची ही रेसिपी असल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. “ही माझ्या बहिणीची रेसिपी आहे. तिनं ही शोधून काढली आणि त्यात सुधारणा केली. मी फक्त आता ती तयार करतो आहे. पण हा माझ्या आईचा फेव्हरेट जॅम आहे”, असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.

Video: राहुल गांधींची कोणती सवय सोनिया गांधींना आवडत नाही? मुलासोबतच्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या, “तो फार…”

“..तर ते आपल्याकडे पुन्हा फेकतील”

यावेळी राहुल गांधींनी भाजपाचा उल्लेख करत मिश्किल टिप्पणी केली. “जर भाजपाच्या लोकांना हा जॅम हवा असेल, तर त्यांनाही तो मिळेल. तुला काय वाटतं आई?” असा खोचक प्रश्न त्यांनी सोनिया गांधींना केला. त्यावर सोनिया गांधींनीही तितक्याच मिश्किलपणे “ते तो पुन्हा आपल्याकडे फेकतील” असं म्हणताच दोघांनी दिलखुलास हसून त्यावर दाद दिली. “मग चांगलंच आहे.. आपण तो पुन्हा उचलून घेऊ”, असं म्हणत राहुल गांधींनी त्यावर शेवटी टिप्पणी केली!

आई म्हणून कोणती गोष्ट आवडत नाही?

दरम्यान, यावेळी राहुल गांधींची कोणती सवय आवडत नाही? असा प्रश्न सोनिया गांधींना विचारला असता त्यांनी राहुल गांधींच्या हट्टीपणावर बोट ठेवलं. “तो खूप हट्टी आहे. फार हट्ट करतो. पण मीही हट्टी आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की काय होत असेल. पण तो आणि प्रियांका माझी फार काळजी घेतात”, असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.

Story img Loader