गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी पात्र उमेदवार नसल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
देशाचा पंतप्रधान हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे पद असून ते पद भूषविण्यासाठी मोदी अथवा राहुल गांधी हे दोघेही पात्र नाहीत, असे आपले मत असल्याचे हजारे म्हणाले. हजारे यांची जनतंत्र यात्रा सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून तेथे आले आहेत. वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील मत व्यक्त केले.
नरेंद्र मोदी हे गेल्या १० वर्षांपासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, मात्र त्यांनी लोकायुक्तांची नियुक्ती करण्यात अनेक अडथळे निर्माण केले. भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी लोकपालांच्या नियुक्तीची गरज नाही, असे मत मोदी यांनी सातत्याने व्यक्त केले आहे, असेही हजारे म्हणाले.
राहुल गांधी हेही पंतप्रधानपदासाठी योग्य नाहीत. भ्रष्टाचार आणि गैरकृत्ये हे देशातील पक्षीय राजकारणाचे परिणाम आहेत. त्यामुळे जवळपास सहा कोटी समर्पित कार्यकर्त्यांना घेऊन आपण जन लोकपाल विधेयकासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे डिसेंबर महिन्यापासून दुसऱ्या आंदोलनाला सुरुवात करणार आहोत, असेही हजारे म्हणाले.
दारिद्रय़ाच्या निकषांबाबत विचारले असता अण्णा हजारे म्हणाले की, जे लोक वातानुकूलित कार्यालयात बसले आहेत ते दारिद्रय़ाचे योग्य मूल्यमापन करू शकणार नाहीत. केवळ ३३ रुपये एका व्यक्तीच्या भोजनासाठी पुरेसे नाहीत, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा