काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी (१८ जानेवारी) आसाममध्ये दाखल झाली आहे. २५ जानेवारीपर्यंत ही यात्रा आसामच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. दरम्यान, आसाममध्ये या यात्रेला भारतीय जनता पार्टी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध होत आहे. ही यात्रा आज (२१ जानेवारी) आसामच्या सोनितपूर भागातील जमुगुरीघाट येथून जात असताना भाजपा समर्थकांनी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांच्या कारवर हल्ला केला. त्यापाठोपाठ या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची बस अडवली. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले होते.
रस्त्यावर सुरू असलेला गोंधळ पाहून राहुल गांधी बसमधून खाली उतरले आणि हा गोंधळ थांबवण्यासाठी गर्दीत घुसले. परंतु, राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना मागे फिरायला सांगितलं. त्यानंतर राहुल गांधी बसमध्ये बसले. रस्त्यावर जमलेले भाजपा कार्यकर्ते राहुल गांधींकडे पाहून मोदी-मोदी अशा घोषणा देत होते. तर, राहुल गांधी यांनी यावर संताप व्यक्त न करता भाजपा कार्यकर्त्यांना फ्लाईंग किस दिलं. या सर्व घटनांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सोनितपूरमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. पदयात्रेतील पुढच्या टप्प्यावर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, येथे येत असताना दोन-तीन किलोमीटर आधी २० ते २५ भाजपा कार्यकर्ते आणि नेते भाजपाचे झेंडे घेऊन आमच्या बससमोर आले होते. त्यांनी बस अडवल्यावर मी बसमधून खाली उतरलो आणि तेवढ्यात ते सगळे पळून गेले. या लोकांना काय वाटतं? काँग्रेस भाजपाच्या किंवा आरएसएसच्या कार्यकर्त्यांना घाबरते का?
राहुल गांधी म्हणाले, हे भाजपावाले नेमकी कसली स्वप्नं पाहत आहेत? तुम्हाला आमचे जितके पोस्टर्स फाडायचे असतील तितके फाडा, होर्डिंग्स फाडा, त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आमची विचारांची लढाई आहे, आम्ही ती लढत राहू. आम्ही कोणाला भीत नाही. ना नरेंद्र मोदींना, ना इथल्या मुख्यमंत्र्यांना, आम्हाला कोणाची भीती नाही.
पदयात्रेवर झालेल्या हल्ल्याची माहिती देताना काँग्रेसने म्हटलं आहे की, हल्ला करणाऱ्या लोकांच्या हातात भाजपाचा झेंडे होते. तसेच त्यांच्यापैकी काहीजण राहुल गांधी यांच्या बससमोर आले आणि त्यांनी बस थांबवली. बाहेर काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढला होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी बसमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बस थांबवायला सांगितली. त्यानंतर राहुल गांधी बसमधून उतरले आणि त्यांनी हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, यावेळी पदयात्रा रोखणाऱ्या काही तरुणांनी पदयात्रेचं चित्रण करणाऱ्या एका ब्लॉगरचा कॅमेरा, ओळखपत्र आणि इतर उपकरणं हिसकावली.