पीटीआय, नवी दिल्ली

‘‘नवीन तंत्रज्ञानाचा विकास, उभारणी आणि वापर करण्यासाठी भारताकडे प्रतिभा आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात देशात उद्योग उभारणी करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मजबूत उत्पादन व्यवस्था हवी,’’ असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केले. यासाठी द्रष्टेपण हवे, केवळ पोकळ भाषणे नकोत अशा शब्दांमध्ये राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

राहुल गांधी यांनी शनिवारी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये ध्वनिचित्रफित सामायिक करत ड्रोनबद्दल मतप्रदर्शन केले. जगभरातील युद्धक्षेत्रात क्रांती घडवणारे ड्रोनचे उत्पादन चीनने सुरू केले आहे यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक स्थान मिळवण्यासाठी भारताने रणनीती विकसित करण्याची गरज आहे असे त्यांनी लिहिले. युद्धभूमीतील हालचाली आणि संप्रेषणात बॅटरी, मोटर आणि ऑप्टिक्स एकत्रित करून ड्रोनने युद्धक्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवल्याचे राहुल म्हणाले.

दुर्दैवाने, पंतप्रधान मोदी हे समजून घेण्यात अपयशी ठरसे. ते एआयवर टेलिप्रॉम्पटरवर वाचून भाषण करतात, दुसरीकडे आपला प्रतिस्पर्धी नवीन तंत्रज्ञानांवर प्रभुत्व मिळवत आहे. भारताला मजबूत उत्पादन व्यवस्था हवी, पोकळ भाषणे नकोत. – राहुल गांधी, नेता, काँग्रेस</p>

Story img Loader