अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिर समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळ, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, क्रिकेटपटू, कलाकार आणि महंतांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसलाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. परंतु, काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की त्यांच्या पक्षाकडून या सोहळ्याला कोणीही उपस्थित राहणार नाही. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी यावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आज (१६ जानेवारी) नागालँडमध्ये पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी नागालँडमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांनी सांगितलं की, ते राम मंदिर उद्घाटन समारंभाला जाणार नाहीत. याचं कारण विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले, २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणारा कार्यक्रम म्हणजे राजकीय इव्हेंट आहे. आम्ही (काँग्रेस) सर्वच धर्मांबरोबर आहोत. मला धर्माचा फायदा उचलायचा नाही. मला त्यात रस नाही. मला माझ्या धर्माचा शर्ट परिधान करून फिरण्याची आवश्यकता नाही. ज्यांना तिकडे जायचं आहे ते जाऊ शकतात. परंतु, आम्ही २२ जानेवारीला अयोध्येत जाणार नाही. आमच्या पक्षाकडून कोणीही अयोध्येला जाणार नाही.

काँग्रेस खासदार म्हणाले, माझं धर्माशी खासगी नातं आहे. तोच माझा विचार आहे. मी माझं जीवन धर्माच्या तत्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांशी नीट वागतो आणि त्यांच्या आदर करतो. मी कधीच द्वेष पसरवण्याचं काम करत नाही.

मी सर्व धर्मांना मानतो : राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाला ‘राजकीय नरेंद्र मोदी इव्हेंट’ बनवलं आहे. हा संघ आणि भाजपाचा कार्यक्रम आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत. आम्ही सर्व धर्मांना मानतो आणि त्यांचा सन्मान करतो. हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या नेतृत्वकर्त्यांनीदेखील (शंकराचार्य) या कार्यक्रमाबाबत त्यांच मत मांडलं आहे. त्यांनीदेखील या कार्यक्रमाला राजकीय इव्हेंट म्हटलं आहे. मी त्यांच्या मताचाही आदर करतो.

हे ही वाचा >> “मोदी शेपूट घालून बसणार की राजीव गांधींप्रमाणे…”, मालदीवच्या ‘त्या’ फर्मानानंतर भाजपा नेत्याचा पंतप्रधानांना घरचा आहेर

राहुल गांधींचा कोहिमा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद

भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. आज ही यात्रा नागालँडच्या कोहिमा शहरात पोहोचली. कोहिमा शहारत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi not going to ayodhya says dont want to take advantage of religion asc