काँग्रेसने अनपेक्षितपणे लोकसभेतील नेते म्हणून माजी रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची निवड केली. उपाध्यक्ष राहुल गांधी ही जबाबदारी स्वीकारतील अशी चर्चा असतानाच खरगे यांची निवड करण्यात आली आहे. राहुल किंवा सोनिया यांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशी भावना बहुसंख्य काँग्रेसजनांची होती. मात्र पक्षाने कर्नाटकमधील नेते खरगे यांची निवड केली आहे.लोकसभेत काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. विरोधी पक्ष नेतपद मिळण्यासाठी लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के जागांची म्हणजेच ५५ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेस हा निकष पूर्ण करत नाही. मात्र लोकसभेच्या अध्यक्षांनी संयुक्त पुरोगामी आघाडी हा एक गट धरला तर त्यांचे ५६ सदस्य आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते.काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही, असे खरगे यांनी स्पष्ट केले. देशाच्या हितासाठी आम्ही काम करत राहू, अशी प्रतिक्रिया त्यांनी नेतेपदी निवड झाल्यावर व्यक्त केली.दलित नेते असलेले खरगे गुलबर्गा येथून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. नेतेपदाच्या स्पर्धेत कमलनाथ होते. सध्याच्या लोकसभेत कमलनाथ सर्वाधिक अनुभवी असून, ते नवव्यांदा निवडून आले आहेत. तरीही पक्षाने खरगे यांच्यावर विश्वास टाकला. कर्नाटकमधून काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आल्याने हा मुद्दा खरगे यांच्या पथ्यावर पडला.

Story img Loader