काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकतीच मणिपूर ते मुंबई पदयात्रेची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर त्यावरून राजकीय टीका-टिप्पणी होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेसकडून या यात्रेची जोरदार तयारी केली जात असताना दुसरीकडे भाजपानं यात्रेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशा भारत जोडो यात्रेची सांगता झाल्यानंतर आता राहुल गांधी मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा करणार असल्यामुळे पूर्ण भारतभर पायी भ्रमण करून जनमत जागृत केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात आसाम विधानसभेतील उपाध्यक्ष व भाजपा नेते डॉ. नुमाल मोमीन यांनी भाष्य केलं आहे.
“आम्ही राहुल गांधींच्या यात्रेचं स्वागत करतो, पण…”
राहुल गांधींवर टीका करताना भाजपानं राहुल गांधींना पूर्वेकडील राज्यांमध्ये घडलेल्या हिंसक घटनांचा दाखला दिला. “आम्ही नॉर्थइस्टमध्ये राहुल गांधींचं भारत न्याय यात्रेसाठी स्वागत करतो. पण त्याचवेळी आम्ही राहुल गांधींना हेही विचारतो की त्यांनी नॉर्थइस्ट भागातल्या लोकांना कोणता न्याय दिला? आसाम दंगलींमध्ये मारल्या गेलेल्या ८५५ तरुणांना त्यांनी कोणता न्याय दिला? त्याशिवाय मणिपूरमध्ये १९९२ साली झालेल्या दंगलींमध्ये किती लोक मारले गेले? १९६६ साली मिझोराममध्ये झालेल्या बॉम्बब्लास्टमध्ये किती लोक मारले गेले? त्या काळात नॉर्थ इस्ट भागात किती निरपराध लोक मारले गेले?” असं मोमीन यावेळी म्हणाले.
“जर राहुल गांधी त्या सर्वांना न्याय देऊ शकले, तर त्यांची ही यात्रा नक्कीच स्वागतार्ह आहे. पण हा फक्त राहुल गांधींचा ड्रामा आहे. कारण त्यांना स्वत:लाच इंडिया आघाडीकडून न्याय मिळत नाहीये. कारण जेव्हा इंडिया आघाडीची बैठक झाली, तेव्हा तिथे मल्लिकार्जुन खर्गेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे जर राहुल गांधींना त्यांच्या स्वत:च्या आघाडीकडून न्याय मिळत नसेल, तर ते नॉर्थ इस्ट भागातील लोकांना काय न्याय देणार आहेत? त्यामुळे सर्वात आधी काँग्रेसच्या काळात मारल्या गेलेल्या निरपराध लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी करावा. त्यानंतर त्यांनी इथून त्यांच्या यात्रेला सुरुवात करावी”, असंही डॉ. नुमाल मोमीन म्हणाले.
कशी आहे राहुल गांधींची यात्रा?
राहुल गांधींच्या या यात्रेदरम्यान १४ राज्यांमधील ८५ जिल्ह्यांचा समावेश असेल. यामध्ये मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र असा एकूण ६ हजार २०० किलोमीटरचा टप्पा राहुल गांधी पायी चालून पूर्ण करणार आहेत. याआधी भारत जोडो यात्रेनं ४ हजार ५०० किलोमीटर अंतर पार केलं होतं.