निवडणुकीदरम्यान ईव्हीएमध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून अनेकदा केला जातो. या निवडणुकीतही ईव्हीएमबरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ईव्हीएममुळे देशातील निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं होते. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असून कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही, असे ते म्हणाले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा – ‘EVM हॅक होऊ शकतात’, एलॉन मस्क यांची शंका; भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर, म्हणाले, “आमच्याकडून शिका…”
राहुल गांधी एलॉन मस्क यांच्या एका पोस्टला रिपोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात करण्यात आलेल्या गुन्हाचाही दाखला दिला आहे. भारतातील ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असून कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही, असं राहुल गांधी म्हणाले. तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात असून जेव्हा एखादी संस्था जबाबदारी सांभाळत नाही, तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
दरम्यान, एलॉन मस्क यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक केले जाऊ शकते, अशी शक्यता मस्क यांनी वर्तविली होती. तसेच ईव्हीएमचा याचा वापर करू नये, अशी सुचनादेखील त्यांनी केली होती. तत्पूर्वी अमेरिकेच्या निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी ईव्हीएमबाबत एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवरूनच एलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हाचा दाखला दिला. मुंबई उत्तर–पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीसह दोघांविरोधात मतमोजणी केंद्रात मोबाइल घेऊन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी एक जण नवनिर्वाचीत खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक होता.