Zakir Hussain Passed Away : प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारांदरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेत होतं. दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
“प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. या दु:खाच्या काळात माझे विचार त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत. उस्ताद झाकीर हुसैन हे त्यांच्या कलेचा जो वारसा सोडून गेले आहेत, जो आपल्या आठवणींमध्ये सदैव जिवंत राहील”, असं म्हणत राहुल गांधींनी झाकीर हुसैन यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन, ‘वाह उस्ताद वाह’ म्हणत तबल्यावर लिलया पडणारी थाप शांत!
महान तबला वादक उस्ताद ज़ाकिर हुसैन जी के निधन का समाचार बेहद दुखद है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 15, 2024
उनका जाना संगीत जगत के लिए बड़ी क्षति है। इस दुख की घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिवार और प्रशंसकों के साथ हैं।
उस्ताद ज़ाकिर हुसैन जी अपनी कला की ऐसी विरासत छोड़ गए हैं, जो हमेशा हमारी यादों में जीवित… pic.twitter.com/ogkLAoe68o
कोण होते झाकीर हुसैन?
झाकीर हुसैन (Zakir Hussain) हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा खान यांचे पुत्र होते. झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘साझ’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली. तसंच वयाच्या १२ व्या वर्षापासून झाकीर हुसैन देशभरात त्यांनी तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती.