Rahul Gandhi On Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २० पर्यटक जखमी झाले आहेत. या जखमींपैकी किमान दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या हल्ल्यानंतर संवेदना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी यांनी पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी या भेकड हल्ल्याचा निषेध केला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. “जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत निषेधार्य आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. मी शोकाकुल कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी आशा व्यक्त करतो,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

“दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकत्र आहे. सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाल्याचे खोटे दावे करण्याऐवजी जबाबदारी स्वीकरत भक्कम पावले उचलावीत. जेणेकरून अशा अमानुष घटना होऊच नयेत आणि निर्दोष भारतीयांना अशा पद्धतीने जीव गमवावा लागू नये,” असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

अमित शाहांचा इशारा

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मी व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमित शाह म्हणाले आहेत.

तसेच त्यांनी या घटनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिल्याचेही म्हटले आहे. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली असून सर्व एजन्सींबरोबर तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यासाठी लवकरच श्रीनगरला रवाना होणार असल्याचेही अमित शाह यांनी सांगितले आहे.

दरम्यान इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांना बैसरन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

“आमच्या रिपोर्टनुसार दोन-तीन दहशदवादी आले आणि त्यांनी बैसरन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार गेला,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. तसेच त्यांनी प्राथमिक माहितीनुसार आठ पर्यटक या हल्ल्यात जखमी असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही नमूद केले.

महत्त्वाची बाब म्हणजे बैसरन येथे फक्त पायी जाता येते, हे एक अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

घटनेनंतर लगेचच, पोलिसांचे एक पथक लष्कर आणि निमलष्करी दलांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पर्यटकांना येथून काढले आणि हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.

या वर्षी पर्यटकांवर झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अतिरेक्यांनी पर्यटकांवर शेवटचा हल्ला केला होता, ज्यामध्ये दोन पर्यटक जखमी झाले होते. ती घटना देखील पहलगाममध्ये घडली होती.