नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मात्र, या सगळ्याने मी घाबरून जाणार नाही आणि केंद्रात सरकारच्या कामगिरीबाबत जाब विचारतच राहणार, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. ते मंगळवारी चेन्नईत पुरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात मला स्पष्टपणे सुडाचे राजकारण होत असल्याचे दिसते आहे. केंद्र सरकार अशाच पद्धतीने काम करते, हीच त्यांची विचारपद्धती आहे, असे राहुल यांनी सांगितले. अशाप्रकारे सुडाचे राजकारण करून मला सरकारसंदर्भात प्रश्न विचारण्यापासून रोखता येईल, असे त्यांना वाटते. मात्र, असे काहीही घडणार नाही. मी आत्ता विचारत असलेले प्रश्न यापुढेही विचारत राहीन. मी सरकारवर अंकुश ठेवणार आणि माझे काम करत राहणार असे राहुल यांनी सांगितले. मात्र, नॅशनल हेराल्ड प्रकरणावर मी दिल्लीला गेल्यानंतरच बोलेन, असे राहुल यांनी स्पष्ट केले.
‘नॅशनल हेराल्ड’ या सध्या बंद पडलेल्या वर्तमानपत्राच्या लखनऊ आणि दिल्लीतील मालमत्ता कथितरीत्या हडप केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी १९ डिसेंबरला दिल्लीतील न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार देत त्यांना मंगळवारी दिल्ली न्यायालयापुढे उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही आज न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत, असे त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १९ डिसेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले.