नितीश कुमार भाजपला जाऊन मिळणार, हे मला तीन-चार महिन्यांपूर्वीच मला माहिती पडले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. बिहारमध्ये कालपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी म्हटले की, नितीश यांनी बिहारमधील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यापूर्वी नितीश मला भेटले होते. मात्र, तेव्हा त्यांनी या निर्णयाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. मात्र, तरीही गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला नितीश कुमार असे काहीतरी करणार, याची कुणकुण होतीच, असे राहुल यांनी सांगितले. बिहारच्या जनतेने जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी नितीश कुमार यांना मते दिली होती. मात्र, वैयक्तिक राजकारणासाठी नितीश यांनी त्याच शक्तींशी हातमिळवणी केली आहे. भारतीय राजकारणाची हीच खरी समस्या आहे. येथे लोक स्वार्थासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि यावर कोणाचेही नियंत्रण नसते, असे राहुल यांनी म्हटले.

लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी आज राजभवनात पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची, तर सुशीलकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीशकुमार हे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी काल बुधवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. आज सकाळी राजभवनात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. त्याआधी सकाळी नितीशकुमार, सुशीलकुमार मोदी यांच्यासह जे. पी. नड्डा हे राजभवनात पोहोचले. सकाळी १० च्या सुमारास राजभवनात शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. राज्यपाल त्रिपाठी यांनी सुरुवातीला नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीशकुमार सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी शपथ घेतल्यानंतर राजभवनात त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Story img Loader