राहुल यांचा इशारा; विरोधकांचे शक्तिप्रदर्शन
सर्वोच्च न्यायालय, रिझव्र्ह बँकेसारख्या संस्था उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केंद्र सरकारला दिला. सर्व विरोधक एकत्र येऊन पुढील निवडणुकीत भाजपला पराभूत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
द्रमुकने येथे आयोजित केलेल्या सभेत राहुल यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन उपस्थित होती. यावेळी विरोधकांनी शक्तिप्रदर्शन केले. भाजप सरकारची देश चालविण्याची कल्पना आमच्यासारखी सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची नाही, अशी टीका राहुल यांनी केली. विविध भाषा व संस्कृती यांचा आदर करण्याची या सरकारची भावना नाही. आता देशातील सर्व आवाज एकत्र येत असून, त्याच बळावर आम्ही भाजपला पुढील निवडणुकीत पराभूत करू, असे राहुल म्हणाले.
द्रमुकचे दिवंगत माजी अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल यांच्या हस्ते द्रमुकच्या मुख्यालयात करण्यात आले. चंद्राबाबू नायडू यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्राच्या सापत्नभावाच्या वागणुकीचा आम्हाला त्रास झाला. तामिळनाडूतील सध्याचे अण्णा द्रमुकचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्याने चालविले जाते असा आरोप नायडू यांनी केला.
राहुल यांच्यासाठी स्टॅलीन आग्रही
आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी द्रमुक अध्यक्ष एम.के.स्टॅलीन यांनी केली आहे. नरेंद्र मोदी सरकारला पराभूत करण्याची क्षमता राहुल यांच्यामध्ये असल्याचे मत स्टॅलीन यांनी व्यक्त केले.