येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या खालोखाल पक्षातील क्रमांक दोनचे नेते बनले आहेत. भविष्यात पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली लढविणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. घोषणेनंतर राहुलसमर्थकांनी फटाके उडवून आणि ढोलताशे वाजवून प्रचंड जल्लोष केला.
शिबिरात गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी राहुल गांधींच्या बढतीचा जयघोष चालविला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हेच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, अशी मागणीही दिवसभर सुरू होती. राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयीचा हा ज्वर शिगेला पोचत असताना शनिवारी सायंकाळी उशिराने सुरू झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी बाके वाजवून एकमुखाने संमत केला. राहुल गांधी यांना पक्षात क्रमांक दोनची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मांडला. ‘राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी देण्यात यावी, अशी पक्षातून अनेक दिवसांपासून मागणी होत असून, प्रसिद्धी माध्यमांमध्येही त्यावर चर्चा सुरू आहे. त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी,’ असा प्रस्ताव अँटनी यांनी मांडला. या प्रस्तावाचे कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले आणि सोनिया गांधी यांनीही या प्रस्तावाला स्वीकृती दिली. राहुल गांधी यांनीही ही जबाबदारी स्वीकारली, असे या बैठकीची माहिती पत्रकारांना देताना पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. काँग्रेसचे सर्व राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्या अधीन असतील, असेही स्पष्ट करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीत आणि प्रचार मोहिमेत राहुल गांधी यांची कोणती भूमिका असेल, याविषयी पक्ष नंतर निर्णय घेईल, असेही द्विवेदी यांनी सांगितले. राहुल यांच्याकडे आजच मोठी जबाबदारी सोपविली जाणार याची चर्चा चिंतन शिबिरात दिवसभरापासून सुरू होती. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मात्र त्याविषयी भाष्य करायचे टाळत होते. चिंतन शिबिरासाठी निश्चित करण्यात आलेल्या पाच विषयांवर दिवसभर वेगवेगळ्या गटांमध्ये झालेल्या चर्चेतून निष्कर्ष काढून जयपूर चिंतन शिबिराच्या घोषणापत्राचा मसुदा तयार करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधींना कोणती जबाबदारी सोपविणार यावरच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते.
लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
गेल्या १५ वर्षांंपासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत असलेल्या सोनिया गांधी यांच्या देखरेखीखाली राहुल गांधी यांच्या रूपाने काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची दिशा निश्चित झाली असून, लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडेच प्रचार आणि नेतृत्वाची सूत्रे असणार हे आता स्पष्ट झाले आहे. आठ वर्षांंपासून राष्ट्रीय राजकारणात उतरलेले आणि दोन वेळा अमेठीचे खासदार असलेले राहुल गांधी पक्षात मोठी जबाबदारी स्वीकारायला इच्छुक नसल्याचे चित्र रंगविले जात होते. पण आज या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला असून, सोनिया गांधी यांचे उत्तराधिकारी व काँग्रेसचे भावी नेते राहुल गांधीच असतील, यावर जयपूरच्या चिंतन शिबिराने शिक्कामोर्तब केले आहे.

Story img Loader