बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. भाजप सरकारला ‘सूट-बूट की सरकार’ असा टोला राहुल गांधी यांनीच लगावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कपडे घालण्याच्या मुद्द्यावरूनच त्यांनी मोदींवर निशाणा साधला. परदेशात असताना मोदी १६ वेळा आपले कपडे बदलतात, अशी टीका राहुल गांधी यांनी शेखपुरामधील जाहीर सभेत केली.
ते म्हणाले, मी टीका केल्यानंतर मोदींनी सूटाचा वापर कमी केला आहे. यावेळी अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांनी सूटापेक्षा कुर्त्याचाच वापर जास्त केला. केवळ सूट घालणाऱ्या आणि श्रीमंत व्यक्तीच चांगले पर्याय सुचवू शकतात, असे मोदींना वाटते, असाही टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे लोक बिहारी लोकांना हुसकावून लावण्याचे काम करतात. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. जिथे जिथे निवडणुका होतात. तिथे भाजपचे नेते लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. बिहारी लोकांविरूद्ध महाराष्ट्रातील लोकांची माथी भडकवण्याचे काम भाजपचे नेते करतात, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी केवळ स्वतःच्या मनातील गोष्टी मन की बातमधून सांगतात. त्यांना गरीब लोकांच्या अडचणींशी काहीही देणे-घेणे नाही, असाही आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा