Rahul Gandhi Parliament Session Speech : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२९ जुलै) लोकसभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पातील त्रुटी दाखवत सरकारवर टीका केली, तसेच जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. या भाषणादरम्यान, राहुल गांधी एक फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत होते, तसेच यावेळी ते म्हणत होते, देशात हलवा वाटला जातोय. देशातील केवळ २ ते ३ टक्के लोक हा हलवा बनवत आहेत आणि आपसात वाटून खात आहेत. परंतु, यात कुठेही दलित, ओबीसी व आदिवासी दिसत नाहीत. राहुल गांधी यांचं हे वक्तव्य ऐकून अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दोन्ही हात कपाळाला लावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी लोकसभेत हलवा समारंभाचे फोटो दाखवत होते. अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी हलवा बनवण्याची प्रथा आहे. ही प्रथा गेल्या अनेक दशकांपासून चालत आली आहे. सभागृहात आज राहुल गांधी यांनी समारंभाचे काही फोटो दाखवत प्रश्न उपस्थित केला की “यात दलित व ओबीसी अधिकारी कुठे आहेत?” राहुल यांच्या या प्रश्नावर निर्मला सीतारामण आधी चकित झाल्या आणि नंतर त्यांनी कपाळावर हात मारला, त्यानंतर त्या हसू लागल्या, तसेच त्यांनी दोन्ही हातांनी चेहरा झाकला होता.

राहुल गाधी म्हणाले, “या फोटोत हलवा वाटप चालू असल्याचं दिसतंय. मात्र यात एकही ओबीसी, आदिवासी किंवा दलित अधिकारी उपस्थित नाही. आपल्या देशात नेमकं काय चाललंय? देशात हलवा वाटला जातोय आणि देशातील ७३ टक्के लोकसंख्येपैकी एकही व्यक्ती तिथे नाही. काही मोजके लोक हलवा खाता आहेत आणि इतरांना काहीच मिळत नाहीये.”

राहुल गांधी

हे ही वाचा >> Rahul Gandhi : राहुल गांधींचं दमदार भाषण अन् निर्मला सीतारामण यांनी चेहरा लपवला; लोकसभेत काय घडलं?

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधी म्हणाले, “२० अधिकाऱ्यांनी मिळून देशाचा अर्थसंकल्प तयार केला. २० लोकांनी हलवा वाटला. मात्र देशातील ९० टक्के लोकांपैकी यात केवळ दोनच जण आहेत. यात एक अल्पसंख्याक व एक ओबीसी अधिकारी आहे. तर हलवा बनवण्याच्या कार्यक्रमात तर यांच्यापैकी एकही अधिकारी तिथे नाही. आदिवासी, ओबीसी आणि दलितांना कुठेच प्रतिनिधित्व मिळत नाहीये. त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की अर्थसंकल्पात जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. देशातील ९५ टक्के लोकांची तीच मागणी आहे.” यावर अर्थमंत्र्यांनी चेहरा लपवला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi parliament session budget halwa ceremony nirmala sitharaman asc