काँग्रेस नेते व वायनाडचे खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रेच्या निमित्ताने मणिपूरपासून मुंबईपर्यंत पायी प्रवास करत आहेत. या प्रवासादरम्यान राहुल गांधींचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जागोजागी राहुल गांधी माध्यमांशीही संवाद साधत आहेत. राहुल गांधींचा असाच एक व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका छोट्या कुत्र्याला बिस्किट देताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, तसेच भाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर टीका करायला सुरुवात केली. आता त्यावर राहुल गांधींनीही खोचक टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं झालं काय?

भारत न्याय यात्रेदरम्यानचा राहुल गांधींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी रॅलीमधल्या गाडीत उभे असून त्यांच्या आसपास पक्षाचे इतर पदाधिकारी-नेते उभे असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात एका व्यक्तीने एक छोटा कुत्रा राहुल गांधींच्या बाजूला गाडीवर ठेवला. त्या व्यक्तीशी बोलता बोलता राहुल गांधींनी त्या कुत्र्याला बिस्किट भरवण्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्यानं ते बिस्किट न खाल्ल्यामुळे राहुल गांधींनी ते कुत्रा घेऊन आलेल्या माणसाच्या हातात दिलं. त्या माणसाच्या हातून कुत्र्यानं ते बिस्किट खाल्लं. हे करताना राहुल गांधी त्या व्यक्तीशी हसत बोलतानाही दिसत आहेत.

भाजपाची टीका!

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमित मालवीय यांनी त्यावरून टीका केली. “काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी पक्षाच्या बूथवरील लोकांची तुलना कुत्र्यांशी केली. आता राहुल गांधी त्यांच्या यात्रेदरम्यान एका कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत होते. कुत्र्यानं बिस्किट खाल्ल नाही तर ते बिस्किट त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिलं. ज्या पक्षाचे अध्यक्ष व युवराज आपल्या कार्यकर्त्यांशी कुत्र्याप्रमाणे वागत असतील, तर अशा पक्षाचा अंत होणं स्वाभाविक आहे”, अशी पोस्ट मालवीय यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून केली.

हिमंता बिस्व सरमा यांनीही यावरून टीका केली आहे. एका यूजरनं ‘राहुल गांधींनी सरमा यांना त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या प्लेटमधून बिस्किट खायला लावले’ असा दावा केला होता. त्यावर सरमा यांनी “मला राहुल गांधीच काय, त्यांचं आख्खं कुटुंबही ती बिस्किटं खायला लावू शकत नाहीत”, असं उत्तर दिलं आहे.

राहुल गांधींचा खोचक सवाल!

दरम्यान, यात्रेदरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भाजपाच्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यावर राहुल गांधींनी भाजपालाच खोचक शब्दांत प्रश्न केला. “ती व्यक्ती माझ्याकडे कुत्र्याला घेऊन आली तेव्हा ते कुत्रं एकदम घाबरलं होतं. थरथरत होतं. मी त्याला बिस्किट दिलं तर ते कुत्रं घाबरलं. मग मी बिस्किट त्याच्या मालकाला दिलं. मालकाच्या हातून कुत्र्यानं ते बिस्किट खाल्लं. मग यात अडचण काय आहे? यात काँग्रेस कार्यकर्त्याचा मुद्दा येतोच कुठे? भाजपाच्या लोकांना कुत्र्यांचं एवढं ऑबसेशन का आहे? कुत्र्यांनी त्यांचं काय बिघडवलंय?” असा खोचक सवाल राहुल गांधींनी भाजपाच्या नेत्यांना उद्देशून केला आहे.