नव्या वर्षाच्या आगमनाच्या निमित्ताने सगळेच एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. काहीजण फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा आप्तस्वकीयांपर्यंत पोहोचवताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी व त्यांच्या आई, अर्थात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला एक स्पेशल व्हिडीओ बनवून त्याद्वारे सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सोनिया गांधींना राहुल गांधींबाबत काही प्रश्न विचारले असता त्यांनी त्यावर मनमोकळेपणाने उत्तरं दिली!

काय आहे या व्हिडीओमध्ये?

राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांची बहीण प्रियांका गांधी यांची एक रेसिपी त्यांच्या घरी किचनमध्ये बनवत असल्याचं दिसत आहे. यावेळी सोनिया गांधीही त्यांच्यासोबत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अर्थात ३१ डिसेंबर रोजी हा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनिया गांधी व त्यांच्यात हलक्याफुलक्या वातावरणात संवादही होताना दिसत आहे.

काय बनवत आहेत राहुल गांधी?

व्हिडिओमध्ये सोनिया गांधी व राहुल गांधींच्या संवादामधून ही रेसिपी प्रियांका गांधी यांची असल्याचं दिसत आहे. सायट्रसच्या फळापासून जॅम बनवण्याची ही प्रक्रिया हे दोघे मिळून करत आहेत. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.

“बाहुबलीकडून मिळणारा…”, विनेश फोगाटच्या पुरस्कारवापसीवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

राहुल गांधींची कोणती गोष्ट सोनिया गांधींना आवडत नाही?

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सोनिया गांधींनी राहुल गांधींबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांची कोणती सवय सोनिया गांधींना आई म्हणून आवडत नाही असं विचारलं असता सोनिया गांधींनी राहुल गांधींच्या हट्टीपणाविषयी सांगितलं. “तो फार हट्टी आहे. खूप हट्ट करतो. मीही हट्टी आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल. आम्ही दोघेही हट्टी आहोत”, असं सोनिया गांधी म्हणाल्या. मात्र त्याचवेळी राहुल गांधी आपल्यावर फार प्रेम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

“पण तो माझी फार काळजी घेतो. फार प्रेम करतो. माझी प्रकृती बरी नसते, तेव्हा तो आणि प्रियांका हे दोघे माझी काळजी घेतात”, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

घरातल्या सगळ्यात चांगल्या कूक सोनिया गांधींच्या आई!

दरम्यान, घरातल्या सगळ्यात चांगल्या कूक या सोनिया गांधी यांच्या आई असल्याचं राहुल गांधींनी या व्हिडीओमध्ये सांगितलं. त्याला सोनिया गांधींनीही दुजोरा दिला. त्यांच्याकडूनच आपण अनेक रेसिपी शिकल्याचंही सोनिया गांधींनी या व्हिडीओत सांगितलं आहे.

Story img Loader